अपघातात पाय गमावले, आता मारताहेत हेलपाटे

न्यायाधिकरणाच्या आदेशानंतरही एसटी महामंडळाकडून भरपाई देण्यास टाळाटाळ
राजगुरुनगर  -अलिबाग जिल्हा मोटार अपघात दावा न्यायाधिकरण यांनी 24 एप्रिल 2017 रोजी निकाल देऊनही अपघातग्रस्त प्रवासी इस्माईल अब्दुल सय्यद (रा वेताळे, ता. खेड) यांना नुकसान भरपाई देण्यास एसटी महामंडळ टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर आली असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी एसटी महामंडळाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, इस्माईल अब्दुल सय्यद हे मुंबई येथे एका खासगी कंपनीत नोकरीत करीत होते. दि. 14 ऑगस्ट 2008 रोजी रात्री एसटी महामंडळाच्या दादर मुंबई पुणे या शिवनेरी व्होल्वो एशियाडमधून (एमएच 06 एस 7490) पुणे येथे येत असताना पनवेल जवळील धामणी गावाच्या हद्दीत चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी बसच्या पुढे जात असलेल्या टॅंकरला (केए 28-5232) पाठीमागून ठोकर मारली होती. यात मोठा अपघात होऊन इस्माईल सय्यद यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले होते. यात सय्यद यांना त्यांच्या डावा पाय कायमचा जायबंदी झाला. डाव्या डोळ्याच्यावर आणि हाताला गंभीर दुखापती झाल्या. सय्यद यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले त्यात त्यांना 3 लाख 85 हजार 572 रुपये डॉक्‍टरचे बिल आले. हे पैसे द्यायचे कसे, हा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर उभा होता. नातेवाइकांकडून हातउसणे घेऊन त्यांनी दवाखान्याचे बिल भरले; मात्र त्यांच्या पदरी कायमचे अपंगत्व आले आहे.
सय्यद त्यावेळी 35 वर्षांचे होते. त्यांना खासगी कंपनीत 31 हजार रुपये पगार होता. त्याचे कुटुंबाचे ते एकमेव आधारस्तंभ होते. अपघातात कायमचे अपंगत्व आल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. याबाबत सय्यद यांनी एसटी महामंडळाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी हेलपाटे मारले; मात्र महामंडळाचे हात वर केल्याने त्यांच्या मोठी निराशा झाली अखेर त्यांनी त्यांचे वकिलांचे माध्यमातून अलिबाग जिल्हा मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे अपघाताची नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढा सुरु केला. साडेचार लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी कोर्टाकडे सय्यद यांनी केली होती. अपघाताची आणि सय्यद याची परिस्थिती लक्षात घेता न्यायालयाने 25 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आणि त्यावरील रकमेवर 9 टक्के व्याज देण्याचे आदेश सन 2009 साली दिले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने सय्यद यांना लेखी पत्र 26 डिसेंबर 2009 रोजी देत सय्यद यांना कळविले की, रा. प. मंडळाने खासगी तत्वावर घेतलेल्या व्होल्वो बसला अपघात झाल्यास जखमींना नुकसानभरपाईची पूर्तता करारानुसार खासगी बसने करायची असून त्यात रा. प. महामंडळ अनुज्ञेय आहे. सय्यद यांनी महामंडळ वापरत असलेल्या खासगी बस कंपनीकडे जाऊन नुकसान भरपाई मागितली; मात्र त्यांनी हात वर केले. या महामंडळाच्या खासगी व्होल्वोला राज्य परिवहन महामंडळाचे तिकीट देण्यात येत असल्याने सय्यद यांनी रा. प. महामंडळाच्या विरोधात अलिबाग कोर्टात दाद मागितली.

फरपट सुरुच…
अलिबाग जिल्हा मोटार अपघात दावा न्यायाधिकरण कोर्टात हा दावा सुरु होता त्याचा निकाल 24 एप्रिल 2017 रोजी देण्यात आला. यामध्ये राज्य परिवहन महामंडळ यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इस्माईल सय्यद यांना 4 लाख 23 हजार 600 रुपये नुकसान भरपाई व त्यावरील दि. 10 डिसेंबर 2010पासून आजपर्यंत दसादशे 9 टक्के दराने व्याज देण्याचे आदेश दिले; मात्र चार महिने उलटूनही सय्यद यांना अपघात नुकसान भरपाई मिळाली नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्य परिवहन महामंडळाकडून सय्यद यांची फरपट सुरुच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)