अपघाताचा बनाव करून भरपाई उकळण्याचा प्रयत्न

जिल्हा न्यायालयाचे पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश; फिर्यादीवर गुन्ह्याची शक्‍यता
प्रभात वृत्तसेवा
नगर -नैसर्गिक मृत्यूनंतर खोटा अपघात दाखवून विमा कंपन्यांकडून पैसे उकळणारी टोळी जिल्ह्यात अद्यापही सक्रिय आहे. त्यात काही वकिलांचाही सहभाग आहे. कोपरगावच्या प्रकरणानंतर आता नगरमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. त्यासाठी अपघातातील वाहन बदलवून विमा असलेले वाहन दाखविण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांनी तपासी अधिकाऱ्यासह फिर्यादीचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नेवासे तालुक्‍यातील खडका फाटा टोलनाक्‍याजवळ महेश देवराम पठारे (रा. वाळवणे, ता. पारनेर) या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. वीस जुलै 2016 रोजी झालेल्या या अपघात प्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महेशचे आईवडील, भावाने मोटार अपघात न्यायालयात नुकसान भरपाई मिळण्यासाठी दावा दाखल केला. या दाव्यात इफको-टोकियो कंपनीकडे आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची मागणी होती. महेश हा जेसीबी चालक होता. त्याला दहा हजार रुपये पगार होता. त्यावर अवलंबित्त्व असलेल्यांची संख्या लक्षात घेऊन ऍड. आर. एल. कातोरे यांनी हा दावा केला होता. मागून येणाऱ्या टेम्पो (क्रमांक एम. एच. 16 ए वाय 2471)ने मोटारसायकलला धडक दिली, त्यात महेशचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे अपघातानंतर दीड महिन्याने कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पोलिसांना पत्र पाठवून हा टेम्पो क्रमांक दिला होता. संजय औटी हा टेम्पो चालवित होता, असे त्यात म्हटले होते.
न्यायालयात विमा कंपनीची बाजू ऍड. अशोक बंग यांनी मांडली. विशेष म्हणजे या अपघातात कोणीही साक्षीदार नव्हता. ज्याने पोलिसांना पत्र पाठवून अपघातातील वाहनाचा क्रमांक कळविला, त्याच्या हेतूबाबत साशंकता घेण्यात आली. औटी याची जेव्हा न्यायालयात उलटतपासणी घेण्यात आली, तेव्हा त्याच्या जबाबात विसंगती दिसली. अपघाताच्या दिवशी औरंगाबादला गेलो होतो. तिथून परतताना अपघात झाला, अशी माहिती त्याने दिली; परंतु औरंगाबादला कोणाकडे गेला होता, कोणत्या कंपनीत माल खाली केला, याची माहिती त्याला देता आली नाही.
या दाव्यात पोलीसही फिर्यादीला सामील झाले होते, असे स्पष्ट झाले. कॉ. सुरेश शिंदे यांनी अपघाती वाहनाच्या क्रमांकाबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे चौकशी करायला हवी होती; परंतु त्यांनी ती केली नाही. महेशच्या वाहनाला अपघात करणारे वाहन वेगळेच होते; परंतु त्याचा विमा नसल्याने विम्याची रक्कम मिळावी, म्हणून दुसरेच वाहन उभे करण्यात आले. त्यात दुसऱ्या वाहन चालकालाही सहभागी करून घेण्यात आले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोटार वाहन प्राधिकरणाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी तो दावा तर फेटाळून लावला. खोटा दावा करणारे देवराम पठारे, तपासी पोलीस अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)