अपघातग्रस्तांना मिळणार त्वरीत उपचार

पुणे – राज्य शासनाने जेजुरी (ता. पुरंदर) येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरीत उपचार मिळणे शक्‍य होणार आहे. सासवड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्राम केअर युनिट स्थापन करण्यात शासनाने यापूर्वी मान्यता दिली होती. तथापी पुरेशी जागा उपलब्ध न झाल्याने तेथील ट्रामा केअर युनिट अद्याप सुरू होऊ शकले नाही. जेजुरी येथील खंडोबा हे देवस्थान महाराष्ट्रातील बहुतांश जनतेचे कुलदैवत असल्यामुळे येथे प्रतिवर्षी सुमारे 50 ते 60 लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच जेजुरी हे पालखी मार्गावरील व पुणे-पंढरपूर राज्य मार्गावरील तसेच पुणे-मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे.

या ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची औद्योगिक वसाहत स्थापित झालेली आहे. याठिकाणी 15 ते 20 हजार कामगार तेथे काम करत असतात. या ठिकाणी असणारी लोकांची वर्दळ व अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर वैद्यकिय सुविधा पुरविणे आवश्‍यक आहे. यासाठी शासनाने 2001 च्या लोकसंख्येवर आधारित राज्यातील आरोग्य संस्था स्थापनेच्या बृहत आराखड्यानुसार जेजुरी येथे ट्रामा केअर युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

या ट्रामा केअर युनिटसाठी जेजुरी नगरपरिषदेने मोफत जागा तातडीने हस्तांतरित करून द्यावी. ट्रामा केअर युनिट कार्यान्वित होऊ शकेल अशी इमारतीची व्यवस्था व कर्मचारी निवासाची व्यवस्था असणे आवश्‍यक राहिल. या जागेत बाह्यरुग्ण सेवा, स्त्रीरुग्ण तपासणीचीही स्वतंत्र व्यवस्था, कर्मचारी बसण्याची व्यवस्था, रुग्णवाहिका पार्किंग होणे अनिवार्य राहिल. त्याचबरोबर या इमारतीमध्ये पाणी, वीज इत्यादींची व्यवस्था असणे आवश्‍यक असल्याचे शासनाने आदेशात म्हटले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)