अपंग सैनिकांसमवेत हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांची सद्भावना रॅली

पुणे – गुलाबपुष्प देऊन आणि फुलांची उधळण करीत चौका-चौकामध्ये झालेले जंगी स्वागत… देशांतर्गत सुरक्षाव्यवस्था ठेवण्याकरीता सज्ज असलेल्या पोलिसांनी व्हिलचेअरवरील अपंग सैनिकांना मैत्रीचा हात देत घेतलेला सहभाग आणि भारत माता की जय, वंदे मातरम्‌… च्या घोषणांनी गुरुवार पेठेतील मोमिनपुरा परिसर दुमदुमून गेला. शहराच्या पूर्वभागामध्ये हिंदू-मुस्लिम गणेशभक्तांनी एकत्र येत अपंग सैनिकांसमवेत सद्‌भाव रॅली काढून ऐन गणेशोत्सवात एकतेचा संदेश दिला.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्ट आणि खडक पोलीस स्टेशनतर्फे मॉं तुझे सलाम ही सद्भावना रॅली काढण्यात आली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक संभाजी शिर्के, विष्णु केसरकर, वैभव पवार, संजय गायकवाड, कल्याणी पाडोळे, मंगेश नांगरे, सागर केकान, हजरत रझाशहा दर्गाह मशिद (शिया) ट्रस्ट विश्वस्त मौलाना शबीह अहसन काजमि, ऍड. शिरीष शिंदे, विद्या म्हात्रे, शिरीष मोहिते, डॉ.मिलींद भोई, उदय जगताप, प्रताप निकम, मंडळाचे अध्यक्ष वैभव वाघ, सचिन ससाणे, उमेश कांबळे, अमेय थोपटे, अमर लांडे, विशाल मोहिते उपस्थित होते.
सन्मानपत्र, उपरणे, श्रीफळ देऊन अपंग पुर्नवसन केंद्र खडकी येथील दर्शनकुमार, एन.उपेंद्रन, अमोल गोरीवाले, एस.एम.राव, बी.के.गिरी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. अपंग सैनिकाशी विवाह करणाऱ्या अमृता गोरीवाले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. मुंबईतील शहीद वाहतूक पोलीस विलास शिंदे, भिवंडी दंगलीत शहीद झालेले बाळासाहेब गांगुर्डे, रमेश जगताप यांच्या कुटुंबियांना देखील गौरविण्यात आले. गुरुवार पेठेतील हजरत रझाशहा दर्गाह मशिद (शिया) ट्रस्ट पासून सुरु झालेल्या रॅलीचा समारोप शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ उत्सव मंडपात झाला. तिरंगी झेंडे, फुलांची उधळण आणि चौका-चौकात महिलांनी केलेले औक्षण अनुभविताना सैनिकांना देखील आनंदाश्रू अनावर झाले. न्यू सुयोग म्युझिकल बॅंड मिरवणुकीत सहभागी झाला होता. शिरीष मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)