अपंगानी किती दिवस सरकारी उंबरठे झिजवायचे

दीपक डोबळे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ः न्याय्य हक्कांसाठी लढा सुरूच
मंचर  -आमदारांचे मानधन पन्नास हजारांवरून दीड लाख रुपये करण्यात आले. मात्र अपंगांचे वेतन 600 रुपये असून त्यामध्ये वाढ करा या मागणीसाठी अनेकदा आंदोलने करूनही झोपलेल्या शासनाला जाग आली नाही. आमदारांचे वेतन विनामागणी व विनाआंदोलन होता वाढते; मात्र अपंगांना त्यांच्या न्याय व हक्कांसाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अनेकदा रस्त्यावर उतरावे लागते. हेच का अपंग व्यक्तींचे स्वातंत्र्य असा रोखठोक सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक / अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी केला.
अपंग हा एक दुर्बल घटक असल्याने सरकार प्रत्येक वेळी अपंगांकडे दुर्लक्षच करत असल्याचे दिसून येत आहे. आता थोड्याच दिवसांपुर्वीची गोष्ट पाहिली असता त्यावरून तर सरकार तुपाशी; परंतु अपंग उपाशी असल्याचे दिसुन आले आहे. शासनाने अपंगांना समान संधी समान कायदा, अपंग पुनर्वसन कायदा 1995 नुसार अपंगहिताचे अनेक शासननिर्णय तसेच परीपत्रके काढली असून या शासननिर्णयांची व परीपत्रकांची अंमलबजावणी होत नाही. या शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याने अपंगांना अनेकदा रस्त्यांवर उतरावे लागले; परंतु निगरगठ्ठ शासनाला काहीही पाझर फुटत नाही. शासकीय कामात अडथळा आणणे यांसारखे अनेक खोटे गुन्हे सूड व आकस बुद्धीने दाखल करण्याची धमकी दिली जाते. तर काही वेळा गुन्हे दाखल केले जातात. मग अपंग कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल होत असतील तर कायद्याचे पालन न करणाऱ्यांना अर्थात कायद्याचे उल्लंघन करणारऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा शिस्तभंगाची व दप्तरा दिरंगाईचा गुन्हा दाखल का होत नाही. हेच का आमचे स्वातंत्र्य हेच का अपंगांचे अच्छे दिन. अपंग प्रमाणपत्र हे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मिळावे यासाठी अपंग हित, विकास व पुनर्वसन संघ व स्वाभिमान अंध अपंग संघ यांनी सन 2012 पासून मागणी केली होती. ती मागणी मंजूर होऊन मागणीला यश आले मात्र अंमलबजावणी होत नाही. आदेश असतानाही अद्याप प्रमाणपत्र वितरण होत नाही. अपंगाना सेवासुविधा देण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद आहे; परंतु राज्य सरकार अपंगाकडे आस्थेवाईकपणे पहात नाही. त्यामुळे अपंगाची हेळसांड होत आहे. सरकारला अपंगांबाबत सुबुद्धी द्यावी. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीत म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर 15 ऑगस्ट 2017 रोजी शिवछत्रपतींना वंदन करून सर्व अपंग बांधव आई तुळजाभवानीला व शिवाई देवीला साकडे घालणार आहोत. अशी माहिती अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक / अध्यक्ष दीपक ढोबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)