अपंगांच्या मागण्यांसाठी अरोग्य अधिकाऱ्यांना घेराव

विविध मागण्यांचे निवेदन : अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाच्या वतीने आंदोलन
– विविध प्रमाणपत्रांसाठी रुग्णालयाच्या माराव्या लागतात चकरा
– संगणीकृत अपंगत्व प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयातून देण्याची मागणी

पुणे – अपंग व्यक्तिंना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी संगणीकृत अपंगत्व प्रमाणपत्राची गरज असते. जिल्ह्यामध्ये हे प्रमाणपत्र फक्त ससून रुग्णालयातून दिले जाते. ससूनमध्ये अपंगांना वेळेवर प्रमाणपत्र दिले जात नसून रुग्णालयामध्ये अपंगांसाठी सोयी सुविधाही नाहीत. यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आलेल्या अपंगांची गैरसोय होत आहे. यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
अपंगत्वाचे प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयातून मिळावे यासाठी अपंग संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी लवकरच उपजिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र देण्याची सुविधा केली जाईल असे आश्‍वासन ससून रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अद्याप उपजिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्र दिले जात नाही. ससूनमध्ये अपंगांसाठी अडथळा विरहित स्वच्छतागृह नाही. अपंगांना प्रमाणपत्रासाठी वेळोवेळी “तारीख पे तारीख’ दिली जाते. यामुळे अपंगांचे आर्थिक नुकसान होते. ससूनमध्ये अपंगांसाठी पिण्याच्या पाण्याची, बसण्याची तसेच डॉक्‍टर अपंगांना भेटण्यास तयार होत नाहीत. अपंगांना प्रमाणपत्र एकाच वॉर्डमध्ये मिळणे अपेक्षित आहे. मात्र, एक्‍सरे काढणे, डॉक्‍टरांची सही घेणे यासाठी दोन ते तीन वॉर्ड फिरावे लागतात. अपंगांकडून एक्‍सरेचे शुल्क घेतले जातात.
अपंग पुनर्वसन कायदा 1995 नुसार अपंगांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक उत्पन्नातून 3 टक्‍के निधी राखीव ठेवावा अशी तरतूद आहे. मात्र, अनेक स्थानिक स्वराज्य संस्था तीन टक्के निधी राखून ठेवत नाहीत. अशा स्थानिक स्वराज्य संस्थांवर कारवाई करावी अशा विविध मागण्यांसाठी अपंग हित, विकास व पुनर्वसन संघाच्या वतीने गुरुवारी ससूनमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी अपंग हित विकास व पुनर्वसन संघाचे संस्थापक अध्यक्ष दिपक ढोबळे, कार्याध्यक्ष अनिल मेमाणे, प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव आणि पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)