अन हरविलेली बालके विसावली आईच्या कुशीत

तळेगाव दाभाडे – पिंपरी रेल्वे स्टेशन येथून लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलमध्ये आई-वडीलांसोबत असलेल्या दोन बालकांची गर्दीमुळे ताटातूट झाली. लोहमार्ग पोलिसांनी ही बाब समजताच, तातडीने तपासाची सूत्रे हालविली. ही दोन्ही बालके लोणावळा रेल्वे स्टेशनवर रडताना आढळली. पालकांकडे नेताच ही बालके तत्काळ आईच्या कुशीत विसावली. त्यामुळे या पालकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पहायला मिळाले.

सोमाटणे फाटा येथील दीपक राघवेंद्र उपाध्याय यांची पत्नी पूजा गर्भवती असल्याने त्यांना पिंपरीतील वाय. सी.एम हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी नेले होते. मात्र, त्याठिकाणी उपचार न झाल्याने या जोडप्याने पुन्हा तळेगाव जनरल हॉस्पीटल येथे येण्याचा निर्णय घेतला. पिंपरी रेल्वे स्टेशन येथून लोकल गाडीतून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास तळेगाव दाभाडे येण्यासाठी लोकल पकडली. या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत त्यांच तीन लहान मुले होती. तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर उतरताना गर्दीच्या लोंढ्यात त्यांची अंश (वय 6) आणि कृष्णा (वय 4) या दोन बालकांची गर्दीत ताटातूट होऊन हरवली.

दरम्यान, या दांपत्याने थेट तळेगाव दाभाडे रेल्वे पोलिसांशी संपर्क साधत, घडलेला प्रकार सांगितला. हे दांपत्य अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होते. त्यांना सर्वप्रथम महिला पोलीस प्रियांका नाईक यांनी धीर दिला. दोन्ही बालकांचे वय व वर्णन लिहून घेतले. त्यानंतर तपासाची सूत्रे हलली. सचिन पवार , संदिप काठे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी तळेगाव दाभाडे ते लोणावळा रेल्वे स्टेशनवर या वर्णनाच्या बालकांचा शोध घेतला. या तपासादरम्यान ही दोन्ही बालके लोणावळा रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेत रडत असताना आढळली. बालकांना ताब्यात घेऊन त्यांना आई-वडिलाच्या ताब्यात दिले. हरवलेले मुले आई-वडिलाच्या कुशीत विसावली. तळेगाव रेल्वे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ही दोन्ही बालके काही तासांतच कुशीत बिलगल्याने या दांपत्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. लोहमार्ग पोलीसांचे आभार मानत उपाध्याय दांपत्याने घराची वाट धरली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)