अन् पुणेकरांचे तोंडचे पाणी पळाले

पाटबंधारे विभागाच्या तडकाफडकी कारवाईने सर्वांचीच धावपळ


विनंतीनंतर रात्री उशिराने पूर्ववत केली सेवा

पुणे – शहराला नियंत्रित पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला दररोज 1,150 एलएलडी पाणी देण्याचा निर्णय झाला आहे. पण, महापालिका जास्त पाणी वापरत असल्याचे कारण पुढे करत पाटबंधारे विभागाने गुरूवारी पुन्हा एकदा महापालिकेचे पाणी पुन्हा अचानक तोडले. थकबाकी, पालिकेने दिवाळीनंतर पाणी कमी करण्याबाबत दिलेले लेखी पत्र अशी कारणे पुढे करत गुरूवारी पालिकेने 1,150 एमएलडी पाणी घेतल्यानंतर खडकवासला धरणाच्या परिसरातील हे पंप सायंकाळी साडेचार वाजता पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांना पाणी कमी पडू न देण्याची मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री तसेच पालकमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत महापालिकेने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती केली. त्यानंतर पंप पूर्ववत सुरू करण्यात आले.

महापालिका जादा पाणी वापरत असल्याची तक्रार वारंवार पाटबंधारे विभागाकडून केली जात आहे. तीन दिवसांपूर्वीच पाटबंधारे विभागाने नव्याने पालिकेस पत्र दिले होते. त्यात “मागील महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत महापालिकेस 11.50 टीएमसी पाणी प्रत्येक वर्षासाठी मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार, 15 जुलै 2019 पर्यंत हा पाणीसाठा वापरण्यासाठी महापालिकेने दररोज फक्‍त 900 एमएलडी पाणी पाणी घेणे अपेक्षीत आहे. मात्र, शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याने महापालिकेस 1,150 एमएलडी प्रतिदिन हा नियंत्रित पाणीपुरवठा मंजूर करण्यात आला आहे. पण, त्यापेक्षा जादा पाणी घेत जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतरही पालिकेकडून काहीच पाणी नियोजन करण्यात आलेले नसल्याने ऑक्‍टोबर-2018 मध्ये महापालिकेने सरासरी 1,355 एमएलडी पाणी दररोज उचलल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी महापालिकेने पाण्याची 204 कोटींची थकबाकी भरावी, अन्यथा पाणी कापण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर पालिकेकडून जलसंपदा अधिकाऱ्यांशी चर्चाही केली जात होती. असे असताना गुरूवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी धरणाच्या ठिकाणी असलेले महापालिकेचे बंद जलवाहिनीचे पंप बंद केले होते.

-Ads-

आयुक्‍त, महापौर हतबल
पंप बंद केल्यानंतर महापौर टिळक आणि महापालिका आयुक्त राव यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच पुढील आठवड्यात राज्यशासनाकडे विनंती करून तातडीने कालवा समितीची बैठक घेतली जाईल, असे सांगत पंप पुन्हा सुरू करण्याची विनंती केली. मात्र, त्यांना साफ नकार देण्यात आला. या उलट थकबाकी आणि दिवाळीनंतर 1,150 एमएलडीच पाणी घेतले जाणार असल्याच्या पालिकेच्या पत्राची आठवण आयुक्तांना करून देण्यात आली. त्यानंतर या दोघांनी जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही बोलणी सुरू होती.

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन गेले कोठे?
कालवा समितीच्या बैठकीत पुण्याचे पाणी कमी केल्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांनी “पुण्याला पाणी पडू देणार नाही’ असे सांगितले होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांतच पाटबंधारे विभागाने पालिकेचे पाणी तोडले. त्यानंतर या महिन्यात दोन वेळा पुण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना “पुण्याला आवश्‍यक असलेले 1,350 एमएलडी पाणी मिळेल. त्याबाबत जलसंपदा विभागास सूचना दिल्या जातील’ असे आश्‍वासन दिले होते. मात्र, अशा कोणत्याही सूचना मिळाल्या नसल्याचा जलसंपदा विभागाचा दावा आहे. तर, गुरूवारी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या दोन्ही नेत्यांनी दिलेली आश्‍वासने हवेतच विरले, की काय? असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

अशा प्रकारे पाणी तोडणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने जलसंपदा विभागाच्या सचिवांसह, पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी संपर्क साधला असून पाणी पुन्हा सुरू करण्याबाबत विनंती केली आहे. तसेच असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून शहरात पाण्याचा तुटवडा होणार नाही, याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– मुक्ता टिळक, महापौर.

गुरूवारी सायंकाळी साडेचारपासून खडकवासला येथील पाण्याचे पंप जलसंपदा विभागाने बंद केले होते. कोणतीही पूर्व कल्पना न देता दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आलेली आहे. पाणी पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अखेर रात्री 10 नंतर पंप पुन्हा सुरू करण्यात आले असून शुक्रवारी शहरात कोणत्याही भागात पाणी कमी पडू दिले जाणार नाही.
– व्ही. जी. कुलकर्णी, विभाग प्रमुख, पाणीपुरवठा.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)