…अन् टेकडीने पुन्हा पांघारला हिरवाईचा शालू

समविचारी तरुणांच्या प्रयत्नातून वृक्षांची लागवड

पुणे – कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असताना, वृक्षांना जगवायचे कसे? असा प्रश्‍न अनेक पर्यावरण प्रेमींना पडला आहे. मात्र, शहरातील एका वृक्षप्रेमीच्या गटाने एकत्र येत, वृक्षसंगोपनाची एक अनोखी यशोगाथा निर्माण केली आहे. या समविचारी तरुणांच्या प्रयत्नातून वाघोली येथील “ग्रीन सनराइज’ टेकडी हिरवाईने नटली असून, या ठिकाणी स्थानिक वृक्षांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

“ग्रीन सनराइज’ ही गेल्या दोन वर्षांपूर्वी एक भकास टेकडी होती. एका संध्याकाळी तेथे फिरायला गेले असता, ब्रजेश पांडा आणि त्यांचे काही मित्र यांना टेकडीवर झाडे लावण्याची गरज जाणवली. केवळ विचार न करता या सर्वांनी त्याठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली. आपल्या कामाच्या वेळा सांभाळून दर शनिवार-रविवारी हे लोक टेकडीवर जाऊन काम करू लागले. झाडांसाठी खड्डे खोदणे, पाण्याची व्यवस्था, झाडे लावणे त्याला जीवंत ठेवणे अशी एक ना अनेक कामे हे लोक याठिकाणी करत होते. सुरवातीला या तरुणांनी 300 झाडे लावली आणि त्याची देखरेख करू लागले. या तरुणांच्या कामाकडे पाहून टेकडीवर फिरायला येणाऱ्या परिसरातील इतर नागरिकांची साथदेखील त्यांना मिळू लागली. यातून टेकडीवर पाण्यासाठी तळे खोदणे, पाण्याची टाकी बसविणे असे विविध उपक्रम राबविले जाऊ लागले. या सर्व उपक्रमांना स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या तरुणांची साथ मिळाली आणि पाहाता पाहाता टेकडीने पुन्हा हिरवाईची शालू पांघरली.

आज या टेकडीवर आम्ही दहा हजार झाडे लावली आहेत. आमच्या कुटुंबियांकडूनही या कामासाठी खूप मदत मिळत असते. या कामात सर्व इतके एकरूप झालो आहोत. की प्रत्येक सण, आयुष्यातील प्रत्येक आनंदाची गोष्ट आम्ही या ठिकाणी साजरी करतो. ही टेकडी आता आमच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचे ठिकाण बनली आहे.

– ब्रजेश पांडा, स्वयंसेवक

केवळ चार तासांत एक हजार झाडांची लागवड
पहिल्यांदा वृक्ष लागवड केल्यानंतर त्या ठिकाणी टेकडीला आग लागली. या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तो प्रकार पाहून आम्ही अतिशय दुखी झालो होतो. मात्र, यातून खचून न जाता पुन्हा नव्याने वृक्ष लागवड करण्याचे ठरविले. यंदाचे उद्दिष्टदेखील पूर्वीपेक्षा जास्तीचे होते. त्यासाठी मोठी मदत मिळवावी लागणार होती. ही मदत मिळविण्यासाठी आम्ही परिसरातील बीजेएस महाविद्यालयात गेलो. तेथील प्राध्यापकांनी आमची मागणी मान्य केली आणि दुसऱ्याच दिवशी संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील शेकडो मुले सामान आणि रोपांसहित टेकडीवर हजर झाले. मोठ्या उत्साहाने त्यांनी या वृक्षलागवडीत सहभाग नोंदविला आणि केवळ चार तासांत एक हजार वृक्षांची लागवड या मुलांच्या सहकार्याने आम्ही केली. “युथ पॉवर’चा खरा अनुभव त्यावेळी आम्ही घेतला असल्याचे या वृक्षप्रेमींनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
27 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
4 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)