अन्‌ मंत्रालयाच्या दारात भाजीपाला…

शेतकऱ्यांकडून संताप व्यक्‍त : पोलिसांची उडाली धावपळ
मुंबई – कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव नाही, त्यातच शेतात जो शेतीमाल पिकला आहे तो विकण्याला मुंबईतही मज्जाव केला जात आहे. त्यामुळे संतापलेल्या उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी आज धडक देत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला ओतून संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या भाजीफेक आंदोलनामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांची धावपळ उडाली.

मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वारासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक एक भाजीपाल्याचा टेम्पो उभा राहिला. गेटवरील पोलिसांना कळायच्या आत या टेम्पोतील शेतकऱ्यांनी लसूण, हिरवी मिरची, कांदा, मुळा अशी भाजी थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ओतून सरकारचा निषेध करण्यास सुरुवात केली. हा थरार सुमारे 15 मिनिटे सुरू असताना पोलिसांचाही नाइलाज झाला.

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा वारंवार केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. एकीकडे सरकार बाजारभाव मिळत नाही, तर दुसरीकडे शेतातला माल थेट मुंबईत विकायला जागा मिळत नाही, याच्या निषेधार्थ या शेतकऱ्यांनी गावाहून आणलेला शेतीमाल मंत्रालयाच्या दारात फेकून निषेध नोंदवला.

यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणाही दिल्या. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच तातडीने मंत्रालय प्रवेशद्वारापुढे स्वच्छताही करण्यात आली. यावेळी पोलीसांनी सात-आठ शेतकऱ्यांना ताब्यात घेत त्यांना मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)