…अन्‌ भोसरीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्‍वास

पिंपरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांची उद्‌घाटने झाली. यानिमित्त भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे सभागृहात मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याकरिता भोसरीतील सर्वच रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविल्याने नागरिकांना विनाअडथळा प्रशस्त रस्त्यांचा अनुभव घेतला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकास कामांबरोबरच एमआयडीसी व दिघी पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) झाले. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी न जाता भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहातून या कार्यक्रमांचे उद्‌घाटन केले. याचठिकाणी त्यांचे भाषणही झाले.

भोसरीतील पुणे -नाशिक महामार्ग आणि भोसरी आळंदी रस्ता सर्वाधिक वर्दळ असते. याच रस्त्यांवर राजकीय पाठबळामुळे फळविक्रेते व अन्य व्यवसायिकांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे वाहनांबरोबरच पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठी अडचण निर्माण होते. याशिवाय भोसरीहून चाकण, खेड, आळंदी, दिघी, खडकी बाजार, वायसीएम रुग्णालय, महापालिका भवन अशा विविध मार्गांवर अवैध वाहतुकीची यात भर पडते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भोसरीत येणार असल्याने, इतरवेळी असलेले फळ विक्रेते व अन्य व्यवसायिकांचे अतिक्रमण महापालिका प्रशासनाने शनिवारी सार्वजनिक सुट्टी असूनही सकाळीच हटविले होते. बहुतांशी फळविक्रेत्यांनी आपल्या हातगाड्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात लावल्या होत्या. याशिवाय शिवाजी महाराज पुतळ्याशेजारील फळ विक्रेते व अन्य व्यवसायिकांना व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना दिल्याने हे सर्व व्यवसाय जवळपास बंद होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)