अन्‌ बिबट्याची मादी पिल्लांसाठी ऊसातून बाहेर आली

संग्रहित छायाचित्र

बछडे सापडल्याने धावली अंगावर ः पिल्लाला तोंडात उचलून ठोकली धूम

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वेताळमळ्यात शेतकरी तुकाराम बबन थोरात यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना बिबट्याची तीन पिल्ले आढळली. त्या तीन पिलांपैकी एका पिल्लाला पकडले असता त्याला सोडविण्यासाठी चक्‍क बिबट्याची मादीच शेतातून बाहेर आली. यावेळी उपस्थितांनी समयसूचकता दाखवत या पिल्लाला सोडून दिले व नंतर मादी बिबट्याने पिल्लाला तोंडात उचलून घेऊन पुन्हा ऊसाच्या शेतात धूम ठोकली. बिबट्याच्या वावरमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान चांडोली गावात बिबट्याचा उपद्रव कायम स्वरूपी होत आहे. वनखात्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी सरपंच प्रीती थोरात यांनी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोली बुद्रुक गावातील वेताळ मळ्यातील शेतकरी तुकाराम बबन थोरात यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना बिबट्याची तीन पिल्ले दिसली. त्यातील दोन पिल्ले ऊसाच्या शेतात पळून गेली. मात्र, एक पिल्लू कामगारांच्या हाती लागले. या पिल्लाला एका करेटमध्ये ठेवण्यात आले होते. प्रवीण थोरात यांनी याबाबत वनखात्याच्या कर्मचार्यांना माहिती दिली. वनखात्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले. मात्र, पिल्लाला नेण्यासाठी चक्‍क मादी बिबट्या बाहेर येऊ लागली. तेव्हा सर्वांची धांदल उडाली. बिबट्याची मादी त्रास देईल म्हणून पिल्लाला मोकळे सोडून सर्वजण काही अंतरावर गेले. मादी बिबट्या पिल्लाला तोंडात धरून ऊसाच्या शेतात घेऊन गेली. हा प्रसंग ग्रामस्थ दूरवरून पाहत होते. फटाके वाजवून बिबट्याला दूर पाठवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान, आज सकाळी ऊस तोडणी कामगार भीतीच्या वातावरणातच शेतात ऊसतोडणी करिता गेले. फटाके वाजवून व मोठा आवाज करून बिबट्याला दूर पाठवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. त्यानंतर उसतोडणी चे काम सुरू झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)