अन्‌ प्रश्‍नांचा नाही तुटवडा…अतिक्रमणे वाढल्याने नगरच्या विकासाचा रथ रुतलेलाच!

शहराचे सौंदर्य बिघडविणारा अजेंडा महत्त्वाचा असूनही या मुद्यावर राजकीय व प्रशासकीय उदासीनता कायम

नगर: शहराची ओळख करून देताना ती निजामशाही कालीन म्हणून करून दिली जाते. इतिहासाची पाने पुढे सरकली, तशी आधुनिकता येत गेली. चाकांमुळे या आधुनिकतेली गती मिळाली. नगरच्या विकासालाही गती मिळाली. परंतु ही गती काहीशी खुंटलेली आहे. मुख्य नगर शहर आणि उपनगरांची परिस्थिती पाहिल्यास कोणत्याही गल्लीबोळात अतिक्रमण नाही, असे होत नाही. अतिक्रमणांचा प्रश्‍न गंभीर आहे. तेवढाच तो संवेदनशील आहे. प्रशासकीय पातळीवर हा प्रश्‍न हाताळताना अधिकाऱ्यांना अनेक अडचणी येतात. लोकप्रतिनिधी तर हा प्रश्‍न पुढे येताच तोंड फिरून घेतात. नगर महापालिकेची निवडणुकीत हा प्रश्‍नांचे गांभीर्य कोणत्याही राजकीय पक्षाला नाही. या प्रश्‍नांवर भाष्य करायचे दूर, तो विषय देखील निघू नाही, याची काळजी घेतली जाते. एवढा हा संवेदनशील विषय आहे. थेट मतदानावर प्रभाव पडणारा हा विषय आजच्या निवडणुकीत कोणत्याही पक्ष-अपक्षांच्या अजेंड्यावर नाही.

नगर शहराची रचना पाहिल्यास आजूबाजूला औरंगाबाद, पुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि ठाणे या जिल्ह्याच्या हद्दी आहेत. नगरच्या तुलनेत इतर जिल्ह्यांच्या विकासांचा वेग पाहिल्यास तो काहीक पटीने जास्त आहे. औरंगाबाद नगरपासून बऱ्यापैकी जवळ आहे. जुन्या औरंगाबादाबरोबर नवे औरंगाबादाचा होत असलेला औद्योगिक आणि नागरी विकास हा वेगाने होत आहे. राज्यात किंवा केंद्रात कोणाचीही सत्ता असो औरंगाबादासहपुणे, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात विकासाची कामे सुरूच असतात. त्या तुलतनेत नगरमध्ये होत नाही. याची कारणे शोधल्यास अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. परंतु कारणांची मीमांसा केल्यावर राजकीय पातळीवरचे “खेडका’ राजकारण याला कारणीभूत असल्याचे दिसते. सत्तेच्या केंद्रस्थानी आपण राहिलो पाहिजे, हा येथील राजकारण्याच्या प्राथमिक अजेंडा आहे. त्यामुळे शहर आणि तेथील नागरी वसाहतींचा विकासाचा अजेंडा येतच नाही. नगरच्या बाबतीत तेच झाले आहे. त्यामुळे राजकीय पातळीवरून प्रशासकीय गोष्टींवर जेवढा अंकुश असायला हवा, तेवढा राहिलेला नाही. प्रशासनाचा सोयीने वापर करून घ्यायचा हाच येथील अजेंडा असल्याने त्याचा परिणाम विकासावर होणारच! परिणामी शहराची रचना ही गुंतागुंतीची झाली आहे. त्याचा परिणाम शहर विकासावर होत आहे.

शहरातील रस्त्याचा विषय घेतल्यास तिथे पहिला मुद्दा अतिक्रमणाचा येतो. हे अतिक्रमण काढायचे कोणी? त्यातच प्रशासनाचा वेळ जातो. प्रशासनाने तयारी केल्यास राजकीय दडपण ठरलेले. राजकीय दडपण झुकारून कारवाई सुरू केल्यास न्यायालयात धाव घेतली जाते. परिणामी अतिक्रमणांचा मुद्दा बाजूला राहातो आणि राजकारण सुरू होते. शहरातून महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतचा फूटपाथ पाहिल्यास त्यावर झोपड्यांपासून ते खाद्यपदार्थ विक्रींच्या हातगांड्यापर्यंतची अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे हटवली, तरी ती “आशीवार्दाने’ पुन्हा जैसे-थे होतात. त्यामुळे अतिक्रमणे वाढतच चालली आहे.

महामार्गालगत असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी व्यवसायाच्यानिमित्ताने मातीची भर टाकून-टाकून ती जागा त्यांच्याच मालकीची केली आहे. याबाबत प्रशासनकीय पातळीवरून कारवाई होत नाही. शहरातील सौंदर्य बिघडविण्यास अतिक्रमणांची मोठी भूमिका असल्याचेही दिसते. ही मोहीम सातत्य ठेवूनही शहरातील अतिक्रमणांवर काहीच फरक पडलेला नाही. या निमित्ताने राजकीय पक्ष-अपक्ष शहरात अतिक्रमण होऊ देणार नाही, एवढा मुद्दा पुढे केला तरी पुष्पळ होईल. परंतु हे धाडस कोण करणार?

सीना नदी अतिक्रमणांपासून दूरच राहिली पाहिजे!

नगर शहराला सीना नदी लाभलेली आहे. ही नदीपात्रात अनेक मोठ्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केलेले आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आला होता. नदीपात्राच्या पूररेषा पेक्षा अतिक्रमण अधिक असल्याची माहिती त्यांना प्रशासकीय पातळीवरून मिळाली. आमदार संग्राम जगताप यांनीही हा मुद्दा जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत लावून धरला होता. राहुल द्विवेदी यांनी सीनेतील अतिक्रमणांचा अभ्यास करून त्यावर हातोडा फिरवला. सुमारे 15 किलोमीटरच्या पट्ट्यातील 350 अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईने चांगल्या-चांगल्याचे धाबे दणाणले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेख इथापे आणि त्यांचे कर्मचारी या काळात आहोरात्र अतिक्रमणांविरोधात कारवाई करत होते.

शहरातील उद्योगपती शरद मुथा यांच्यासारख्या अनेकांचे नदीपात्रात अतिक्रमणे होते. महसूलने या कारवाईची मोहीम हाती घेतली होती. अतिक्रमणांवर जेसीबी फिरून तिथे मोठी चर मारली. याचबरोबर सीना नदीपात्रातील गाळ हटविण्यात आला. यामुळे अतिक्रमणांमध्ये बुजत चाललेली सीना नदीचे पात्र पुन्हा दिसू लागले. सीना नदीपात्रातील अतिक्रमणे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या रुपाने खमक्‍या अधिकाऱ्याची प्रतीक्षा नगरकरांना करावी लागली. हेच अतिक्रमण महापालिकेला हटविता आले असते. पण तसे झाले नाही. जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतल्याने हे शक्‍य झाले. या अतिक्रमण हटविण्याच्या वेळी एकाही राजकीय पक्षाने त्याचे स्वागत केले नाही. परंतु काहींना अतिक्रमणे वाचविण्यासाठी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला, हे तथ्य आहे. शहरातून गेलेल्या सीना नदीचे पात्र हे अतिक्रमणांपासून मुक्तच राहिले पाहिजे. हे पात्र अतिक्रमणमुक्त राहिल्यास भावी पिढीला या नदीचा इतिहास समजले. हे तेवढेच सुखकारक राहणार आहे.

महामार्गालगतचे फूटपाथ अतिक्रमणमुक्त हवेत

नगर शहरातून महामार्ग गेला आहे. सोलापूर, मनामाड, औरंगाबाद, कल्याण, पुणे, दौंड आणि बीडकडे जाणारे रस्ते शहरातून गेले आहे. हा रस्ते महामार्गात मोडतात. शहरातून गेलेले महामार्गालगत अतिक्रमणांचा पसारा वाढला आहे. या अतिक्रमणांवर अनेकादा कारवाई झाली. परंतु परस्थिती जैसे-थेच आहे. या अतिक्रमणांमुळे अनेक अपघात झाले आहेत. शेकडो जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. काही जणा कायमस्वरूप जायबंद झाले आहे. याच महामार्गालगत शहरातील बहुतांशी महाविद्यालये आहेत. जड वाहतुकीचा विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका कायम असतो. काहींना अपघातात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. असे असताना शहरातील महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई होत नाही. फूटपाथ अतिक्रमणांनी व्यापले आहेत.

शहराचे सौदर्यं महामार्गालगतचे फूटपाथ देखील दाखवितात. फूटपाथांवर झोपडपट्या आहेत. यात देखील रहिवाशी आहे. अपघात झाल्यास मोठी जीवीतहानी होऊ शकते. याच झोपडपट्टींमधील लहान मुले महामार्गावर खेळताना दिसतात. काहींना अपघात देखील झाला आहे. हे दुहेरी संकंट लक्षात घेऊन शहरातील महामार्ग अतिक्रमण मुक्त होईल का, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याच महामार्गालगत एमआयडीसी आहे. एमआयडीसीचे रस्त्यावर भाजीबाजार भरतो. येथे जड वाहनांद्वारे झालेले अपघात सर्वश्रूत आहेत. तरी देखील या अतिक्रमणांवर कारवाई होताना दिसत आहे. एमआयडीसी असल्याने या भागात जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या भागात नागरी वसाहती देखील वाढत आहे. हे लक्षात घेऊन येथील रस्ते हे अतिक्रमण मुक्तच हवेत. नगरकरांच्या जीवावर बेतणारा हा मुद्दा राजकीय अजेंडा होऊ शकत नाही का?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)