..अन्‌ “त्यांच्या’वरच मित्राच्या शवविच्छेदनाची वेळ!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव स्मृती चव्हाण रुग्णालयातील (वायसीएमएच) शवविच्छेदन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या त्यांच्या सहकारी मित्रांवरच शवविच्छेदन करण्याची दुर्देवी वेळ आली.

शशिकांत रामदास जाधव (वय-38, रा. काळेवाडी) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात मानधनावर कामाला होते. 26 ऑक्‍टोबरला ते घरी असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागल्याने त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. त्यामुळे नियमाप्रमाणे जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवागृहात आणण्यात आला. मात्र आपल्याच सहकाऱ्यावर शवविच्छेदन करण्याची वेळ आल्याने सहकाऱ्यांचे सराईत असणारे हात थर-थर कापू लागले व डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

समोर आपल्याच सहकाऱ्याचा मृतदेह पाहून मात्र, त्यांना रडू कोसळले. हे आपले कामच आहे, येथे भावनिक होऊन चालणार नाही, असे ते स्वतःला समजावून सांगत होते. इतर काही कर्मचाऱ्यांनी तयारीसाठी आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही आपल्या भावनांना आवर घालता आला नाही. शवविच्छेदन कक्षात त्यांचे सहकारी रडत होते तर बाहेर नातेवाईक. सर्व कर्मचाऱ्यांची ही स्थिती पाहून डॉ. श्रीकांत हिंगे यांनी कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन कक्षाबाहेर काढून स्वतः शवविच्छेदन करावे लागले.

जाधव हे मानधनावरील कर्मचारी असल्याने त्यांना महापालिकेच्या कोणत्याही सेवेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जाधव यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)