…अन्‌ आठवलेंना ते दिवस आठवले!

पिंपरी – केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले चक्‍क भोसरीतील अशोकनगर रिपाइं शाखेच्या नामफलकाच्या अनावरणासाठी रविवारी (दि. 25) हजर राहिले. एवढेच नव्हे तर दलित पॅंथर, रिपाइं ते केंद्रीय मंत्री पदाचा प्रवास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला. दलित पॅंथरच्या काळापासून संघर्ष करणारे हजारो जण आजही माझ्यासोबत आहेत. त्या कार्यकर्त्यांना फुलविण्याबरोबरच गॅंगवॉरमधील अनेक तरुणांना सुधारण्याचे काम मी केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, रिपाइंचे प्रदेश पदाधिकारी बाळासाहेब भागवत, शहराध्यक्ष सुधाकर वारभुवन, अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख, असित गांगुर्डे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष विनोद चांदमारे, सुधीर कांबळे, संदीप कवडे, एम.एम. रेड्डी, प्रशांत मोरे, संदीप दुबे, अशोक कांबळे, मनोहर डोळस आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, माझी कारकीर्द मुंबई वडाळ्यातील सिद्धार्थ होस्टेलपासून सुरु झाली. त्याचवेळी पॅंथरचा जन्म झाला. पॅंथरच्या काळापासून जीवाला जीव देणारे, माझ्या खांद्याला खांदा लावणारे आणि खेड्या-पाड्यातील दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड ताकदीने उभे राहिलले या चळवळीतील अनेकजण आजही माझ्यासोबत आहेत. माझ्यासारखा माणूस केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहचेल, असे मलाच कधी वाटले नव्हते. मात्र, आपल्यासारखे हजारो- लाखो कार्यकर्ते माझ्यामागे उभे राहिले, त्यामुळेच हे मंत्रीपद मिळाले, असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. तसेच अनेक जाती धर्माचे लोक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये असून, सर्व जाती धर्माचे नागरिक या पक्षाकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्ष हा खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक राजकीय पक्ष आहे. आपण कुणी तरी कमी आहोत, ही भावना प्रत्येकाने आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.

नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले की, दिवसेंदिवस सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. सरकारी नोकरींच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षित सरकारी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय, उद्योग सुरू करून, इतरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. त्यामुळे अनेकांच्या कुटुंबाला आधार मिळतो.
सुधाकर वारभुवन यांनी सूत्रसंचालन केले. खाजाभाई शेख यांनी आभार मानले.

कार्यकर्त्यांवर रागावले अन्‌ गौरवही
या कार्यक्रमात व्यासपीठावर बसून मोबाईलवर बोलणाऱ्या एका कार्यकर्त्याला आठवले यांनी सगळ्यांसमोर चांगलेच झापले. मात्र, दुसऱ्याच मिनिटाला माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारा कार्यकर्ता असा उल्लेख करत, आपला राग तात्पुरता असतो, हेच आठवले यांनी यामधून दाखवून दिले. आठवलेंच्या स्वभावाचे हे रूप या कार्यक्रमात दिसून आले. त्यामुळे रागावलेल्या कार्यकर्त्याची मान देखील सर्वांसमोर ताठ झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)