#अन्वयार्थ: गैरप्रकारांना चाप लागणार? (भाग १)

मोहन एस. मते 
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चालणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष तसेच उमेदवाराकडून पैशांचा मुक्त वापर केला जातो. मतदारांना आर्थिक तसेच मद्याचे आमिष दाखवले जाते. या आणि अशा अनेक गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी आता निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. ही अत्यंत स्वागतार्ह आणि लोकशाही व्यवस्थेमधील तेवढीच महत्त्वाची बाब आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि पारदर्शक वातावरणात व्हाव्यात म्हणून सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना या प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासून राबविण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. निवडणूक प्रक्रिया ही कर्तव्यदक्ष आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांकडून हाताळण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात यावी म्हणून आयोगाने 31 जुलै 2018 रोजी आदेश निर्गमित केला आहे. स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुकांमध्ये पैशांची उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर होते. या राजकीय अर्थकारणाची दृष्टी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्य राजकारण आहे. हेच महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य दिसत आहे.
मुळातच भारत हा कदाचित जगातला एकमेव देश असावा जिथे बाराही महिने वेगवेगळ्या निवडणुकांचा हंगाम सुरू असतो. अगदी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद नगर परिषदा, महापालिका तसेच विधानसभा, लोकसभा या शिवाय राज्यसभा आणि विधान परिषदेच्याही निवडणुकांचा हंगाम सुरूच असतो. देशात होणाऱ्या छोट्या-मोठ्या निवडणुकांच्या खर्चाचा अंदाज काढला तर तो सहजपणे एक ते सव्वालाख कोटींच्या वर जाईल. निवडणूक आयोगाच्याच आकडेवारीप्रमाणे सांगायचे तर एका लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला अधिकृतपणे 10 हजार कोटी किंवा त्यापेक्षा अधिक खर्च येतो.
म्हणजे ढोबळमानाने एक लोकसभा निवडणूक ही किमान 40 ते 42 हजार कोटींच्या पैशांचा चुराडा करते. देशभरातील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा हिशेब त्यात जोडला तर तो असाच 55 ते 65 हजार कोटींपर्यंत पोहोचतो. काही वर्षांपूर्वी एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जाहीरपणे सांगितले होते की, खासदार होण्यासाठी उमेदवाराला आठ कोटी रुपये खर्च करावे लागतात. तर दुसऱ्या एका नेत्याने मतदानापूर्वी मतदारांना “लक्ष्मीदर्शन’ होईल, ते त्यांनी घ्यावे असे उघडपणे सांगितले होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)