… अन्यथा रामोशी समाज तीव्र आंदोलन करणार

फलटणला मोर्चा : एसटीमध्ये समावेश करण्याची मागणी

फलटण(प्रतिनिधि)- बेरड, बेडर, नायका, रामोशी या एकच जाती असून या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अन्यथा आम्ही महाराष्ट्रात आक्रमक आंदोलन करुन शासनाला जेरीस आणू, असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतराव शितोळे यांनी दिला.

-Ads-

फलटण येथील तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते बोलत होते. मोर्चामध्ये संघटनेचे खजिनदार संजय जाधव, पुणे जिल्हाध्यक्ष नाना मदने, अरविंद जाधव, सातारा जिल्हाध्यक्ष राजेंद्र बोडरे, प. महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. सुभाष गुळवे, फलटण मार्केट कमिटीचे माजी संचालक बाळासाहेब मदने, दीपक मदने, धनाजी जाधव, राजू शिरतोडे, अनिल शिरतोडे, गुलाब भंडलकर, गणेश जाधव आदींसह अनेक जिल्हयातील रामोशी समाज बांधव सहभागी झाला होता.
शितोळे म्हणाले, मागील वर्षी सरकारने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती शासन पातळीवर साजरी करण्यास मान्यता दिली. मात्र, एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यास टाळाटाळ केली. बेरड, बेडर, नायका, रामोशी या जातींचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा. या जातींना इतर राज्यात अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गात समाविष्ट केले आहे. परंतु, महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात रामोशी समाज असतानाही समावेश का केला नाही. याबाबत तातडीने निर्णय झाला नाही तर रामोशी समाज बांधव रस्त्यावर उतरून 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रभर उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

याबाबतचे निवेदन तहसिलदार विजय पाटील यांना दौलतराव शितोळे यांनी दिले. आंदोलनाला राष्टवादी कॉंग्रेसतर्फे पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, सचिन सस्ते, राष्टीय कॉंग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव फडतरे, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित रणवरे, पंचायत समिती सदस्या जयश्री आगवणे, मराठा समाजाचे माउली सावंत आणि विविध संघटना यांनी पाठिंबा दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)