अन्यथा, मराठा समाजासोबत शिवसेनाही रस्त्यावर उतरेल -उद्धव ठाकरे

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, निरपराध मराठा तरूणांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या!
मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. आंदोलनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात बाहेरच्या व्यक्तिंचा हात असताना निरपराध मराठा समाजाच्या तरूण-तरूणींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबात मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा. अन्यथा, मराठा समाजासोबत शिवसेनाही रस्त्यावर उतरेल असा इशारा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना कायम मराठा समाजासोबत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी प्रथम स्पष्ट केले. मराठा समाजाने आधी लाखोंचे मूक मोर्चे काढले. मात्र त्यांना गांभीर्याने न घेण्यात आल्याने रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरला नाही. रस्त्यांवरील आंदोलनात बाहेरच्यांनीच हिंसा केली. पण त्याचे खापर मराठा समाजावर फोडण्यात आले. शिवरायांचा मावळा कधी महाराष्ट्र पेटविण्याचा विचार करूच शकत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जे हिंसाचारात आहेत व ज्यांच्याविरोधात सिसीटीव्ही फुटेज आदी भक्‍कम पुरावे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास हरकत नाही. मात्र आपल्या न्याय हक्‍कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा तरूण-तरूणींवर दाखल केलेले गुन्हे मागे घेतले गेले पाहिजेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ते अद्याप पाळले गेले नाही. कोणत्याही पोलीस ठाण्याला अद्याप तसे आदेश देण्यात आले नाहीत. आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. विघ्नर्हत्याचे आगमन होणार आहे. तेव्हा हे अटकरूपी विघ्न तात्काळ दूर व्हावे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, अशी आपली मागणी असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
धनगर, कोळी समाजालाही न्याय द्या! 
मराठा समाज असो वा धनगर, महादेव कोळी समाज या सर्व समाजांच्या न्याय हक्‍काच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत. आरक्षणाच्या मागणीबाबत चालढकल सुरू आहे. आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी आपण आधीच केली आहे. तसे अधिवेशन घ्या, त्यात ठराव मंजूर करून संसदेत पाठवा अशी मागणीही ठाकरे यांनी केली.
कोपर्डीच्या निर्भया कुटुंबियांची मागणी पूर्ण करा! 
कोपर्डीच्या निर्भयाची केस फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात आली. दोषींना शिक्षाही सुनावण्यात आली. पण आता दोषी वरच्या कोर्टात गेले आहेत. वरील कोर्टातही ऍड. उज्ज्वल निकम यांनाच बाजू मांडण्याची जबाबदारी देण्यात यावी अशी निर्भयाच्या कुटुंबियांची व समाजाची मागणी आहे. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावी. तसेच निर्भयाच्या भावाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यावर देखील तातडीने निर्णय घ्यावा, याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)