…अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही

अजित पवार : शिरूरची लोकसभा जिंकून दाखवेन

शिरूर- शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नसेल तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे शरद पवार साहेबांना सांगितले आहे. मी जर शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीचा फॉर्म भरला तर या मतदारसंघातून निवडणूक जिंकून दाखवील; अन्यथा पवाराची अवलाद सांगणार नाही, असा इशाराच माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कार्यक्रमातून माजी मंत्री पवार यांनी प्रत्यक्षपणे शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात शिरूर लोकसभा मतदारसंघात वातावरण चांगलेच तापले आहे.
शिरूर बाबूराव नगर येथे एका खासगी कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी श्रीगोंदाचे आमदार राहुल जगताप, भोरचे आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक पवार, दादाभाऊ कळमकर, सूर्यकांत पलांडे, नगराध्यक्षा वैशाली वाखारे,महानगर बॅंकेचे उदय शेळके, जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदीप कंद, माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल, भास्कर लामखडे, राजेंद्र लामखडे, महेंद्र शेट्टी, सभापती विश्‍वास कोहकडे, शशिकांत दसगुडे, रवी काळे, प्रवीण दसगुडे उपस्थित होते.
नोटाबंदीमुळे राज्याची व देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येकजण अडचणीत आला आहे. पाच राज्यांत भाजपचे सरकार गेल्यानंतर आता हे राज्यकर्ते मोठ मोठे गाजर दाखवण्याचे काम करीत आहे. आता नुकतेच सांगितले आहे की, प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला दहा हजार रुपये टाकणार असल्याचे सांगितले आहे. आता जानेवारी महिना असून मार्च महिन्यात पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपये म्हणजे हा निव्वळ चुनावी जुमला असल्याचे पवार यांनी टोला लगावला.
पवार म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षांमध्ये देशाची व राज्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. साडेचार वर्षे अतिशय वाईट गेले आहेत. पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या डाळिंबाचे पैसे मिळाले नसल्याने त्यांची 15 ते 16 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. प्रशासक नेमणे, अशा अनेक गोष्टी केल्याने हे झाले असून याची चौकशी होणार आहे. परंतु आपल्या विचाराचे मंडळ निवडून न दिल्याने फसवणूक झाली आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा खरपूस समाचार घेताना पवार म्हणाले की, मंत्री पाटील यांनी नुकतीच घोषणा केली की, शेतकऱ्यांनी 10, 20, 50 हजार रुपये ठेवायचे. त्याला शासन 19 टक्‍के व्याज देणार आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेतून राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. हेच यातून दिसत आहे. सध्या शिक्षक भरती बंद, इतर नोकर भरती बंद आहेत. आरक्षणाचा काय जुमला आहे. हे त्यांचे त्यांनाच माहिती आहे. असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रातील भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळामध्ये राफेल विमान 560 कोटी रुपयांना मिळत होते. तेच राफेल विमान भाजपाच्या काळात सोळाशे कोटी रुपयांना विकत घेतले. त्यावर राहुल गांधी विचारतात, कोणीच काही बोलत नाहीये, देशाचे पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. विमानाचे कॉन्ट्रेक्‍ट अनिल अंबानी यांना का दिले, हे देशासमोर यायला पाहिजे. परंतु याबाबत कोणीच बोलायला तयार नाही. आता नवनवीन घोषणा करण्यामध्ये भाजपा सरकार गुंतले आहे. नको ती उत्तरे दिली जात आहेत. भाजपामध्ये सध्या वाचाळविचारांची संख्या वाढत असल्याची टीकाही पवार यांनी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लवकरच रायगड जिल्ह्यातून निर्धार परिवर्तनाचा दौऱ्याला सुरुवात करण्यार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)