दशरथ माने यांचा इशारा : दूध पिशव्यावरील निर्बंधाचा वाद उफाळला
बिजवडी- राज्य सरकारने दुधाच्या पिशवीवरील निर्बंध मागे न घेतल्यास राज्यातील दूध संघ शेतकऱ्यांच्या दुधाची खरेदी करणार नाही, असा इशारा सोनाई दूध अध्यक्ष दशरथ माने यांनी दिला आहे. दूध संघाच्या निर्वाणीच्या इशाऱ्यामुळे दूध पिशव्यावरील निर्बंधाचा वाद उफाळून आला आहे.
माने म्हणाले की, राज्य सरकारने राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. आता या बंदीचे लोन दुधाच्या पिशव्यापर्यंत येवून पोहचले आहे. राज्य सरकारने आता 50 मायक्रॉनपेक्षा कमीच्या पिशव्यांवर बंदी घातली आहे. तर दुधाच्या पिशव्यावरही काही निर्बंध घातले आहेत. ते दूध उत्पादक संघांना जाचक आहेत. ज्यात जी दुधाची पिशवी संघामधून दुध भरून डिलर, सबडिलर, रिटेलर आणि ग्राहकापर्यंत जाते. ज्या या वितरण साखळीमधून पिशवी जाते. त्याच पद्धतीने परत ती पिशवी संघाकडे येणार आहे. याला जास्त वेळ आणि खर्च लागणार आहे. ते संघाना परवाडणारेही नाही. याबाबत राज्यातील दूध संघांची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत जोपर्यंत राज्य सरकार दुधाच्या पिशवीवरील निर्बंध मागे घेत नाहीत. तोपर्यंत दूध संघ शेतकऱ्यांचे दूध खरेदी करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्यातून 50 ते 60 लाख लिटर दूध मुंबईला येते. ते आता मुंबईकराना मिळणे अडचणीचे होणार आहे. राज्य सरकारने प्लॅस्टिकच्या पॉलिथीन पिशव्या आणि उत्पादन करणाऱ्या कंपन्यावर काही निर्बंध घातल्याने या पिशव्यांवर गदा आली आहे. त्यामुळे या पिशव्या आता काही दिवसातच दुधापासून फारकत घेणार आहेत. जर हेच दूध काचेच्या बाटलीत द्यायचे झाल्यास त्या दुधाची किंमत कमीतकमी वीस ते पंचवीस रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे हे दूध सर्वसामान्य ग्राहकाच्या खिशाला परवडणारे नाही. तर संघांनी शहरात दूध न देण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांच्या दुधाल उठाव होणार नाही. हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही.
जर काचेच्या बाटलीत दूध दिले तर त्याला अनंत अडचणींचा सामना करवा लागणार आहे. काच हाताळणी, तुटफूट, काचबाटली परत संघांकडे पाठवणे, संघांकडे गेल्यावर तिला निर्जंतुक करणे या प्रक्रियेला संघांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे दुधाच्या किंमतीत मोठी वाढ होईल, हे ग्राहकाला परवडणारे नाही. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा