…अन्यथा जनता “पिंजरा’ लावून बसलीच आहे!

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी मंत्रालयातील उंदीर घोटाळा उघडकीस आणून सरकारला चांगलेच पिंजऱ्यात पकडले. मंत्रालयातील 3 लाख 19 हजार 400 उंदीर सात दिवसांत कसे मारण्यात आले, असा सवाल खडसे यांनी विधानसभेत करताच संपूर्ण सभागृहच अवाक्‌ झाले. मंत्रालयातील या कारभारावर शिवसेनेच्या मुखपत्रातून निशाणा साधला आहे.

उंदीर हा शेतकऱ्याचा “मित्र’ म्हटला जातो, हे आतापर्यंत माहीत होते, पण तो घोटाळेबाजांचाही “मित्र’ असल्याचे महाराष्ट्राच्या विधिमंडळातच उघड झाले आहे. भाजपचे नाराज नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच गुरुवारी मंत्रालयात “उंदीर घोटाळा’ झाल्याचा स्फोट केला. त्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली आहे. विधिमंडळातील या गौप्यस्फोटामुळे घोटाळेबाज असा शिक्का बसलेल्या मंत्रालयातील उंदीरमामांमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्या हे कळायला मार्ग नाही.

कदाचित, हे आरोप हेतुपुरस्सर आणि मूषकयोनीला बदनाम करण्याचे कारस्थान आहे असे म्हणत राज्यभरातील मूषकराजांचा एखादा लॉंगमार्च उद्या मुंबईवर धडकू शकतो. या लॉंगमार्चचे निवेदन मुख्यमंत्री स्वीकारतात की नाही हे सांगता येणार नाही. कारण मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामान्य प्रशासन विभागाने राबविलेल्या मोहिमेतच हा घोटाळा झाल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यावर खुलासे-प्रतिखुलासे होत राहतील, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे कार्य’ करू शकतात हा नवा साक्षात्कार महाराष्ट्राला झाला हे महत्त्वाचे.

या प्रकरणावरून येथील तथाकथित स्वच्छ प्रशासनाला बिळे पडली आहेत, मंत्रालयाची जमीन भुसभुशीत झाली आहे, दलाल आणि उंदरांचा सुळसुळाट झाला आहे, असे आरोप सत्ताधारी पक्षाचेच लोक करीत आहेत. महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू “उंदरालय’ झाले आहे. एकनाथ खडसे यांनी कोणत्या हेतूने मंत्रालयातील उंदीर घोटाळयाचा स्फोट केला हे त्यांचे त्यांनाच माहीत, पण अमुक-तमुक मुक्त’ करण्याची भाषा करणाऱ्यांच्याच राज्यात मंत्रालय घोटाळेबाज उंदीरयुक्त झाले आहे. ते उंदीरमुक्त करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. अन्यथा, राज्यातील जनता पिंजरा’ लावून बसलीच आहे!, असा टोमणा मारण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)