…अन्यथा, गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा

पुणे – राज्यातील 22 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे गेल्या वर्षीचे एफआरपीचे पैसे थकविले आहेत. ही रक्कम 220 कोटी रुपयांच्या आसपास आहे. ही थकीत रक्कम मिळाल्याशिवाय या कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊ देणार नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-

शहरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीचे एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत त्यांनीसुद्धा यंदाच्या गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यांना जरी परवानगी मिळाली असली तरी, आम्ही शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळाल्याशिवाय हे कारखाने सुरू होऊ देणार नाही. त्याचबरोबर काही कारखान्यावर महसूली कारवाईचे आदेशसुद्धा देण्यात आले होते; पण सहकारमंत्र्यांनी या आदेशाला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ सहकारमंत्री हे शेतकऱ्यांच्या नाही तर, कारखान्यांच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होत आहे.

ते पुढे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17 वी ऊस परिषद येत्या 27 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यात थकीत एफआरपी आणि चालू वर्षातील एफआरपी संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार यंदा एफआरपीमध्ये 200 रुपयांनी वाढ केली आहे. पण, वस्तूस्थिती वेगळी आहे. एफआरपीचा रिकव्हरी बेस हा 9.30 टक्‍क्‍यावरून केंद्र सरकारने 10 टक्के केला आहे. त्यामुळे उलट शेतकऱ्यांना टनामागे जादा रक्कम भरावी लागणार आहे. त्यातच डिझेलचे दर वाढले आहेत. खताच्या किंमतीसुद्धा 100 ते 300 रुपयांनी वाढल्या आहेत. एकंदरीत उसाच्या उत्पादन खर्चात टनामागे 40 ते 45 रुपयांनी वाढ झाली आहे. 200 रुपये एफआरपीमध्ये वाढ केली असली तरी, त्यातील टनामागे 186 रुपये शेतकऱ्यांकडून काढून घेणार आहे. म्हणजे ही निव्वळ फसवणूक आहे. त्यामुळे ऊस परिषद झाल्याशिवाय आम्ही गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही. या ऊस परिषदेमध्ये निर्णय होईल, मगच गाळप हंगाम सुरू होईल.

ऊस दर नियंत्रण कायद्यांनुसार साखर कारखान्यांवर बंधने घातली पाहिजे. 25 किलोमीटरच्या अंतरात 2 साखर कारखाने नसावेत, हा नियम आहे. पण, तो पाळला जात नसल्याने उसाची पळवापळवी होत आहे. त्यामुळे त्याचे नुकसान हे शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. हे योग्य नाही, असे ही शेट्टी यांनी सांगितले.

भाजपचे राजकारण किळसवाणे
राज्यात भाजपाचे सध्याचे राजकारण हे किळसवाणे आहे. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे आगामी काळात एका समान कार्यक्रमावर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. त्यासंदर्भात आपणसुद्धा भारीपचे बाळासाहेब आंबडेकर यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. दीडपट हमी भाव व संपूर्ण कर्जमाफी हे आमचे दोन मुद्दे आहेत. याबाबतचा कायदा करण्यासाठी आम्हाला जे कोणी मदत करतील. त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)