अन्यथा आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन

सेवा रस्ते दुरुस्तीसाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा  रिलायन्सला अल्टीमेटम

सातारा – महामार्गाचे सहापदरीकरण झाले, मात्र या महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. सेवा रस्त्यांची तर दुर्दशा झाली असून नुकत्याच झालेल्या पावसात रायगाव फाटा येथील सेवा रस्त्यावर भयावह परिस्थिती निर्माण झाली. याला महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार रिलायन्स कंपनी जबाबदार आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत आणि आनेवाडी येथे टोलवसुली मात्र जोमाने सुरु आहे. महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीला हा शेवटचा अल्टीमेटम आहे.

तातडीने आनेवाडी टोलनाका आणि सातारा तालुक्‍याच्या हद्दीतील महामार्गावरील खड्डे भरा आणि प्रामुख्याने सेवा रस्त्यांची दुरुस्ती करा, अन्यथा टोलबंद आंदोलनासह उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले आहे की, महामार्गाच्या सहापदरीकरणासाठी आनेवाडीसह परिसरातील आणि सातारा तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन करण्यात आले. सहापदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने ठिकठिकाणी महामार्गावर खड्डयांची चाळण झाली असून वाहनचालकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. दुसरीकडे महामार्गालत तयार करण्यात आलेल्या सेवा रस्त्यांची तर फार मोठी दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, अरुंद आणि खचलेल्या सेवा रस्त्यांमुळे स्थानिक वाहनचालक आणि प्रवाशांचा जीव टांगणीला लागत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रायगाव फाटा येथे पुलाखाली पाणी साचल्याने सेवा रस्त्याला नदीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

महामार्ग प्राधिकरणाच्या ठेकेदाराच्या भोंगळ कारभारामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने याठिकाणी पाणीच पाणी झाले आणि भयंकर परिस्थितीचा सामना येथील स्थानिक लोकांना करावा लागला. रायगाव फाटा येथे सेवा रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले. याचपध्दतीने लिंबखिंड येथून साताऱ्याकडे जाणाऱ्या सेवा रस्त्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गावरील पुलाखाली पाणी साचत आहे तर, पुलापासून ते विठ्ठल मंगलम कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. तसेच सेवारस्त्यावरील पथदिवे म्हणजे शोपीस बनले आहेत. पथदिवे बंद असल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.

वारंवार सुचना देवून, लेखी पत्रव्यवहार करुनही महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स कंपनीला जाग येत नाही. त्यामुळे आता हा शेवटचा इशारा असेल. तातडीने सेवारस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा आनेवाडी टोलनाका येथे टोलबंद आंदोलन केले जाईल आणि महामार्ग प्राधिकरण व रिलायन्सच्या विरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे. दरम्यान, माझ्या संयमाचा अंत रिलायन्सने पाहू नये. तातडीने सेवारस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलनास सामोरे जा. होणाऱ्या परिणामांची जबाबदारी ही महामार्ग प्राधिकरण आणि रियालन्सची असेल, असेही पत्रकात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)