…अन्यथा अपंग दिनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत नुकत्याच झालेल्या अपंग कल्याण समितीच्या बैठकीला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. केवळ मर्यादित स्वरूपाची बैठक असल्याचे बेजबाबदारपणाचे उत्तर देणाऱ्या महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी अपंग बांधवांची माफी मागावी, अन्यथा येत्या 3 डिसेंबरला होणाऱ्या अपंग दिनाच्या महापालिकेच्या कार्यक्रमावर शहरातील सर्व अपंग बांधव बहिष्कार घालतील, असा इशारा अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने देण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. प्रहार अपंग क्रांती ही संघटना पिंपरी-चिंचवड शहरातील अपंग बांधवांचे प्रतिनिधित्व करते. अपंगांना द्यावयाच्या सोयी-सुविधा व शासकीय योजनांबाबत ही संघटना कायम आग्रही असते. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 नोव्हेंबरला अमफग कल्याण समितीची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या बैठकीनंतर शहरातील अपंग बांधवांना उपलब्ध करुन दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांची प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली.

शहरातील अपंग बांधवांबाबत कोणताही निर्णय घेताना आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीला शहरातील या घटकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे अपंग बांधवांना आपले जीवन अधिक सुलभरित्या जगता येऊ शकते. दरम्यान, या बैठकीबाबत या संस्थेचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी स्मिता झगडे यांच्याशी चर्चा केली असता, ही बैठक फक्त समितीपुरती मर्यादित असल्याचे उत्तर झगडे यांनी दिले. त्यामुळे शहरातील अपंग बांधव कमालीचे संतप्त झाले आहेत.

महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत शहरातील अपंग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मात्र, मागणी करुनही अनेक बाबतीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या न्याय मागण्यांना केराची टोपली दाखविली जाते. त्यामुळे स्मिता झगडे यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.
– दत्ता भोसले, अध्यक्ष, अपंग क्रांती आंदोलन.

कोण आहेत स्मिता झगडे ?
राज्य सरकारकडून महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर प्रतिनियुक्तीवर आलेल्या स्मिता झगडे यांची आजपर्यंतची कार्यशैली वादग्रस्त राहिली आहे. त्यांच्या कार्यशैलीबाबत महापालिकेच्या महासभेत नगरसेविका सीमा सावळे यांनी आक्षेप घेत, त्यांना चांगलाच घाम फोडला होता. अनधिकृत फलकांबाबत तक्रार करणाऱ्याचे नाव उघड केल्याबद्दलही त्यांना पदाधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता अपंग प्रहार क्रांती आंदोलन संघटनेने देखील त्यांच्या कार्य पद्धतीबद्दल टीका केली आहे. त्यामुळे त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)