अन्न प्रक्रिया व फुडपार्क धोरणांसंबंधी कार्यशाळा

पुणे – कृषी उत्पादन व अन्न साखळीतील प्रक्रिया प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांपर्यंत अनुदान देणारी नवी योजना लवकरच केंद्र सरकारकडून लागू करण्यात येणार आहे. शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी आता गुंतवणूकदारांनी पुढे यावे, त्यामुळे शेतकऱ्यांना देखील आधार मिळणार आहे. असे राज्याचे प्रधान कृषी सचिव विजय कुमार यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या नव्या अन्न प्रक्रिया व फुडपार्क धोरणांची माहिती देण्यासाठी नाबार्डमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत ते बोलत होते. नाबार्डचे मुख्य सरव्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य सहकार विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक संचालक मिलिंद आकरे, सातारा मेगा फुड पार्कचे अध्यक्ष एच.आर गायकवाड, उपाध्यक्ष विजयकुमार चोले, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात आता सातारासह तीन मेगा फुड पार्क होत आहेत. याशिवाय केंद्र सरकारच्या निधीतून नऊ भागांमध्ये स्वतंत्र फुडपार्क होत आहेत. फुड पार्क बाहेर तयार होणाऱ्या प्रकल्पना देखील राज्य शासनाकडून मदत मिळेल. अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान मिळणार असेल तरी केवळ अनुदानासाठी प्रस्ताव तयार करु नका. अनुदानाचा वापर व्यवसायातील जोखीम कमी करण्यासाठी करावा, असेही विजय कुमार यांनी सांगितले.
अनुदानाच्या योजनेत विविध संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गुंतवणूकदारांना यात सहभागी होता येणार आहे. त्यासाठी पाच कोटींच्या मर्यादेत प्रकल्प खर्चाच्या पस्तीस टक्‍यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. वैयक्तिक स्तरावर या योजनेसाठी एकदाच अर्ज करता येणार असून प्रकल्प खर्च किमान तीन कोटी ठेवावा लागणार आहे, अशी माहिती विजयकुमार चोले यांनी सांगितली.
या फुडपार्कमध्ये स्थापन होणाऱ्या उद्योगांसाठी 75 टक्‍यांपर्यंत अंदाजे 8.45 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे, असे योगिता खांडगे यांनी सांगितले.
शेतकरी उद्योजकांसाठी अशा स्वरुपाच्या कार्यशाळा राज्यात विविध ठिकाणी घेण्यात येतील अशी घोषणा राजेंद्र कुलकर्णी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)