अन्नाविषयी समज गैरसमज

अन्नाविषयी बहुतेक सर्वच देशात समज गैरसमज बरेच आहेत. त्यापैकी बरेचसे धार्मिक कारणांमुळे आहेत. तर काही गैरसमज रुढी व परंपरेनुसार चालत आले आहेत. आहारशास्त्रामध्ये इतकी प्रगती होऊनसुद्धा तज्ज्ञांना हे गैरसमज लोकांच्या मनातून काढून टाकता आले नाहीत. काही गैरसमज खाली दिले आहेत. ते अर्थातच चुकीचे आहेत.

 

दक्षिण पॅसिफीक बेटांमधल्या लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की, समुद्रातले शेलफीश गर्भवती बाईने खाल्ले तर होणाऱ्या मुलाच्या मस्तकावरही खवले खवले तयार होतात.


इथिओपीयामध्ये असे मानतात की, गर्भवती महिलेने रोस्टेड मांस खाऊ नये. अन्यथा गर्भपात होतो, असा तेथे समज आहे


अंडी खाल्ल्याने टक्कल पडते व वांझपणा येतो असा एक समज श्रीलंकेमध्ये आहे.


गर्भवती महिलांनी पपई खाल्ल्याने गर्भपात होतो असा एक गैरसमज भारतामध्ये आहे. तसेच बाळंतीणीने खूप लसूण खाल्ल्यास स्तनातले दूध वाढते, असा एक समज आहे.


दूध आणि मासे एकत्र खाल्ले तर कुष्ठरोग होतो, असा समज पश्‍चिम बंगालमध्ये आहे. डाळ आणि दही एकत्र खाल्ले तर अंगावर कोड फुटते, असा समज गुजराथमध्येसुध्दा आहे.


बोकडाची जीभ मुलांनी खाल्ली तर मुले बडबडी होतात आणि बोकडाचे पाय खाल्ले तर मुलांच्या पायात व्यंग होते असा समज आफ्रिकेमध्ये आहे.


काही पदार्थ उष्ण असतात आणि काही थंड असतात असाही गैरसमज आहे. उष्ण पदार्थ खाल्ले तर अंगात उष्णता निर्माण होते. गळवं होतात आणि थंड पदार्थ खाल्ले तर सर्दीपडसे होते, घसा बसतो. मांस, अंडी, उसळी, सुकामेवा आणि तेलबिया उष्ण असतात. तर फळे, भाज्या, दूध थंड असतात, असे मानले जाते.

आणखी काही गैरसमज आणि त्याचे निराकरण
गैरसमज- सकाळी नाश्‍ता करणे आरोग्याला चांगले नसते
हा समज चुकीचा आहे. सकाळचा नाश्‍ता कधीही चुकवू नये. आदल्या रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्‍ता यामध्ये आठ ते दहा तासांचे अंतर असते. सकाळी उठल्यावर रक्‍तामधली साखर आणि कॅलशियम कमी झालेली असते. ती शरीराला पुरवावी लागते. नाहीतर हायपोग्लायसिमीयामुळे चक्कर येते. थकवा येतो. कामात उत्साह राहात नाही.

कॅलशियमची पूर्तता केली नाही तर शरीर हाडांमधून कॅलशियम उसने घेते. असे रोज होत असेल तर हाडांमधले कॅलशियम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात. म्हणून सकाळी पूर्ण गव्हाचा टोस्ट, ब्रेड किंवा पोळी व भाजी खायला हवी. दूध प्यायला हवे.

गैरसमज : ब्रेडपेक्षा टोस्टमध्ये कॅलरीज कमी असतात
टोस्ट हा भाजलेला ब्रेड असतो. भाजल्यामुळे त्याला तांबुस रंग येतो. त्याला डेक्‍स्ट्रीनाईज्ड ब्रेड असे म्हणतात. ब्रेड आणि टोस्ट दोन्हीमध्ये कॅलरीज तेवढ्याच असतात.

गैरसमज : मधामध्ये साखरेपेक्षा कॅलरीज कमी असतात
शंभर ग्रॅम मधामध्ये 319 कॅलरीज असतात. तेच लोण्यामध्ये 729 कॅलरीज असतात. म्हणजे मधात जास्तच कॅलरीज असतात

गैरसमज : पाणी पिल्याने वजन कमी होते
पाण्यामध्ये कॅलरीज नसतात हे खरं आहे, पण त्याने वजन कमी होते असे नाही. पाण्यामध्ये बरीचशी खनिजे असतात. आहारात मीठ जास्त प्रमाणात खाल्ले तर शरीरात पाणी साचून राहते आणि त्यामुळे पायावर व अंगावर सूज येते.

गैरसमज : पालकाची भाजी खाल्लाने शक्‍ती येते
पालकामध्ये लोह असते. इतर भाज्यांच्या मानाने ते दहापट असते. मांसामध्ये जे लोह असते ते भाज्यांमधल्या लोहापेक्षा शरीरात लवकर शोषले जाते. भाज्यांमधले लोह दोन ते 20 टक्‍के इतकेच शोषले जाते. तर मांसामधले लोह 10 ते 30 टक्‍के शोषले जाते. पालकामध्ये ऑक्‍झॅलेटची स्फटीके असतात. ती पालकातल्या लोहाला बांधून ठेवतात. त्यामुळे पालकाची भाजी खाल्ल्यावर त्यात लोह असूनही ऑक्‍झॅलेटमुळे आतड्यातून शोषले जात नाही. पालकामधल्या लोहामुळे ताकद येते असा जो समज आहे तो चुकीचा आहे.

गैरसमज : मुलांना दूध आवश्‍यक आहे
मुले जर योग्य, पौष्टिक आहार रोज नियमितपणे घेत असतील तर दूध घेण्याची काहीही आवश्‍यकता नाही. दुधाला पूर्णान्न म्हणतात ते खरं आहे. दुधामध्ये शरीराला आवश्‍यक असणारे प्रथिने, कर्बोदके, स्निग्धपदार्थ, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. दुधामध्ये लोह आणि क जीवनसत्व मात्र खूपच कमी प्रमाणात असते. ते मात्र इतर अन्नपदार्थातून घ्यावे लागते. लहान मुलांना केवळ दूधच पाजले आणि इतर अन्नपदार्थ दिले नाहीत तर त्यांना ऍनिमिया होण्याची शक्‍यता असते.

गैरसमज : क जीवनसत्व मोठ्या डोसमध्ये घेतले तर सर्दी-पडसे बरे होते
या विषयावर अनेकवेळा संशोधन झाले आहे. बऱ्याच पेशंटना मोठ्या डोसमध्ये क जीवनसत्व देऊन बघितले आहे, पण त्याने सर्दी-पडसे बरे होते किंवा वारंवार होणे बंद होते असे आढळून आले नाही.

गैरसमज : चहामध्ये कॉफीच्या मानाने कॅफीन कमी असते
उलट आहे. एक चमचा चहाच्या पानांमध्ये एक चमचा कॉफीच्या मानाने कॅफीन जास्त असते. पण चहा करताना आपण त्यात जास्त पाणी घालतो त्यामुळे कॅफीनचा दुष्परिणाम तितकासा जाणवत नाही.

गैरसमज : रोज एक सफरचंद खाल्ले तर डॉक्‍टरांकडे वारंवार जावे लागत नाही
सफरचंदामध्ये कोणतेही खास असे औषधी गुण नाहीत. मध्यम आकाराच्या सफरचंदामध्ये 10 ग्रॅम क जीवनसत्व, तेच संत्र्यामध्ये 50 ग्रॅम असतं. तसेच सफरचंदातून केवळ 45 कॅलरीज मिळतात. 12 ग्रॅम साखर, आणि 2 ग्रॅम फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मिळतात.

गैरसमज : फिकट तांबूस रंगाच्या अंड्यापेक्षा पांढरे शुभ्र अंडे जास्त पौष्टिक असते.
दोन्हीमध्ये काहीही फरक नसतो. काही कोंबड्या तांबुस रंगाची अंडी घालतात एवढेच. या अंड्यामध्येसुध्दा पांढऱ्या अंड्याइतकेच पौष्टिक घटक असतात.

गैरसमज : लोण्यापेक्षा मार्गारीनमध्ये कमी फॅट असते
मार्गारीन आणि लोणी दोन्हींमध्ये 16 टक्‍के पाणी आणि 84 टक्‍के फॅट असते. दोन्हींमध्ये ए जीवनसत्व सारख्याच प्रमाणात असते. पण ड जीवनसत्व मार्गारीनमध्ये जास्त असते. दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते त्यामुळे लोणी किंवा मार्गारीन थोडेसे जपूनच खायला हवे. शिवाय लोण्यामध्ये किंवा बटरमध्ये मीठ जास्त असते. ह्रदयविकार किंवा रक्‍तदाब असणाऱ्यांनी बटर जरा कमीच खायला हवे.

गैरसमज : मधामध्ये बरेच आरोग्यदायी घटक असतात
हे अजून सिध्द झाले नाही. मधामध्ये फलशर्करा फ्रक्‍टोज, ग्लुकोज व पाणी असते. ते इतक्‍या अल्प प्रमाणात असते की त्याचा आपल्या आरोग्यावर फारसा परीणाम होत नाही.

गैरसमज : गरोदर स्त्रीने दोघांचे म्हणजे दुप्पट अन्न खायला हवे
गरोदर स्त्रिला नेहमीपेक्षा 300 कॅलरीज जास्त खायला हव्या असे तज्ज्ञांचे मत आहे. म्हणजे संपूर्ण नऊ महिन्यांमध्ये 50000 कॅलरीज होतात. या हिशोबाने ते अगदी सामान्य प्रमाण आहे. अन्नाविषयी असलेले असे परंपरागत गैरसमज मनातून काढून टाकणे अत्यंत गरजेचे असून आपल्या सर्व शंकांची उत्तरे आपल्या डॉक्‍टरांकडून घ्यावीत, हे सर्वात उत्तम.

डॉ. अरुण मांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)