अन्नधान्याच्या जुन्या वाणांचे सेंद्रिय शेतीद्वारे ब्रॅंडिंग

पाईट-सध्या आदिवासी शेतकऱ्यांकडे असणारे जुने वाण दुर्लक्षित होत जाऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या जुन्या वाणांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतल्यास व त्याचे सेंद्रिय पद्धतीने संवर्धन केल्यास मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन विषमुक्त अन्नधान्याची पैदास होऊ शकते. या उत्पादित अन्नधान्याचे प्रमाणीकरण ग्रेडिंग, पॅकिंग, पणन, व्यावसायिक पद्धतीने केल्यास मोठा आर्थिक प्रगती होण्यास मदत होणार आहे.
भात पिकाच्या जुन्या वाणांचे संवर्धन व सेंद्रिय शेती व त्याचे मूल्यवर्धन शिबिर महाराष्ट्र शासन, आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, सह्याद्री स्कूल गुंडाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद व संजय पाटील जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी शेतकरी प्रशिक्षण तोरणे खुर्द येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी आदिवासी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खेड तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर, सह्याद्री स्कूल गुंडाळवाडी समन्वयक दीपा मोरे, पाईट कृषी मंडलाधिकारी डी. एन. गायकवाड, कृषी पर्यवेक्षक व्ही. आर. पडवळ, कृषी सहायक नवीन गुंडाळ, प्रवीण शिंदे, एम. एस. वाळे, डी. पी. घोरपडे, डी. डी. नाईकरे, श्वेता वायळे, आरती मोरे, भाग्यश्री पिंगट, शांताराम सावंत, तुकाराम लोहोट, प्रयोगशील शेतकरी लक्ष्मीबाई लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी ही एक संजीवनी असून आदिवासी शेतकऱ्यांसाठी शासन बाजारपेठ तर उपलब्ध करणारच आहे. त्याबरोबर या शेतकऱ्यांची एक कंपनी स्थापन करणार असून या शेतकऱ्यांना कंपनी मालक बनण्याची संधी आहे.
सह्याद्री स्कूल कृष्णमूर्ती फाऊंडेशनच्या दीपा मोरे म्हणाल्या, जुने बियाणे व लागवड पद्धत नवी तसेच नवे सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर केल्यास खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. संकरित बियाणांपेक्षा जुनी बियाणे जास्त दमदार असून प्रतिकूल परिस्थितीत पिके जोम धरतात ही जुनी बियाणांची शेती म्हणजे हमखास उत्पादन. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीने शेती करून विषमुक्त उत्पादन करावे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. जी. गुंडाळ व पी. एम. शिंदे यांनी केले तर नथु निधन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  • …म्हणून सेंद्रिय शेतीची गरज
    खेड तालुक्‍यातील पश्‍चिम भागात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे या भागातील प्रमुख पीक म्हणून भात पिकाकडे पाहिले जाते सध्या उत्पादन वाढावे म्हणून कृषी महाविद्यालये व संशोधन केंद्रांमार्फत नवनवीन बियाणांचा तसेच खतांचा शोध लावून नवनवीन खते व बियाणांचा वापर करून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते; परंतु या अन्नधान्यामध्ये पौष्टिक तत्त्वांचा अभाव व अनेक रासायनिक विषारी घटकांचा समावेश असल्याने पोट भरण्यासाठी ठीक; पण सुखी जीवन जगण्यासाठी अतिशय घातक असल्याने सेंद्रिय शेती करणे काळाची गरज भासू लागली आहे.
  • जुन्या बियाणांची ओळख
    शेतकऱ्यांना जुन्या बियाणांची ओळख करून देण्यात आली. यावेळी जुना आंबेमोहर, खडक्‍या, रायभोग, साळ, झिनी, जावयाची गुंडी, लाल्या, ढवळ, राजगुड्या, हरयाणा, चिमनसाळ, कमळभात, काळभात, नांदेड हिरा, पुसा, जिरा, कोळपी, कुदरत, जोंधळी जिरगा, भोगावती, महाडी, ढवळ आशा 34 प्रकारच्या भाताच्या वाणांचे प्रदर्शन करण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
15 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
2 :heart_eyes:
2 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)