अनैसर्गिक संबंधाच्या त्रासाने पत्नी घटस्फोटाची हक्कदार 

पती पत्नीच्या सहजीवनात शरीर संबंध हा महत्वाचा दुवा असतो. मात्र अनेकदा महिला विकृत मानसिकतेच्या पुरुषांच्या बळी पडतात. अशा विकृत प्रवृत्तीच्या शिकार झालेल्या महिला बरेचदा अनैसर्गिक सबंधासारख्या बाबी सिद्ध करु शकत नाहीत. त्यामुळे त्यांना कायदेशीर घटस्फोट मिळणेही अवघड होते. मात्र आठ दिवसांपूर्वी दिनांक 1 जून 2018 ला पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक महत्वपूर्ण निर्णय देत कौटुंबिक न्यायालयाने पत्नीचा फेटाळलेला घटस्फोट मान्य करीत, अनैसर्गिक जबरदस्तीने ठेवलेले सबंध प्रत्यक्ष सिद्ध करणे अशक्‍य असले, तरी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे पत्नी घटस्फोट मागू शकते असे स्पष्ट केले. न्या. एम. एम. एस. बेदी व न्या. हरीपाल वर्मा यांच्या खंडपीठाने एका अपीलावर महत्वपूर्ण व वैशिष्ट्‌यपूर्ण निकाल दिला आहे.

हिंदु विवाह कायद्यात प्रामुख्याने स्वत:च्या जोडीदाराशिवाय इतरांशी शरीरसंबंध ठेवणे, जोडीदाराला क्रूरतेची वागणुक देणे, एखाद्याला असाध्य आजार असणे, दोन वर्षापेक्षा जास्त अवधीसाठी एखाद्या जोडीदाराने दुसऱ्याला सोडुन जाणे, एखादयाला अनैसर्गिक सबंधाच्या अथवा बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा होणे, शारीरीक व मानसिक त्रास देणे, सात वर्षांपेक्षा जास्त ठावठिकाणा नसणे, धर्मांतर करणे अथवा मानसिक विकृतावस्थेमुळे जोडीदाराबरोबर राहणे अशक्‍य असणे अशा कारणांमुळे एक जोडीदार दुसऱ्याकडून घटस्फोट मिळवण्यास पात्र ठरतो.

घटस्फोटामधे अनैतिक संबंध सिद्ध करणे हि अतिशय अवघड बाब असते, त्यामुळे अनेकदा महिला अथवा पुरुष न्यायापासून दूर राहतात. त्यातच काही विकृत व्यक्ती अनैसर्गिक संबंधांसाठी आपल्या पत्नीला जबरदस्ती करताना दिसतात. अशा प्रसंगी महिलाना होणारा शारीरीक त्रास, त्यांच्या वेदना सहन करण्याच्या पलिकडे असतात.अनेकदा काही जण मासिक पाळीच्या काळातही त महिलेला त्रास होत असेल तरी संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतात. त्यामुळे अशा वेळी महिलांची घुसमट होते. मग अशा विकृत मानसिकतेच्या पतीपासून विभक्त राहून महिला घटस्फोटाचा दावा करतात. पण हे विकृत कृत्य सिद्ध करणे अशक्‍य असल्याने महिला परस्पर संमतीच्या घटस्फोटाचा निर्णय घेतात.
प्रस्तुत खटल्यात पत्नीने पतीविरुद्ध भटींडा न्यायालयात घटस्फोटासाठीचा अर्ज दाखल केला. सदर अर्जात पतीने ज्या बिहारच्या कंपनीत नोकरी करतो असे सांगितले होते, त्या कंपनीत प्रत्यक्षात तो नोकरीला नव्हता, हे निदर्शनास आले.

तरीही पत्नी एक मुलगा होईपर्यन्त पतीजवळ राहिली. नंतर पती हुंड्यासाठी त्रास देऊ लागला त्यानंतर तो अनैसर्गिक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती करु लागला. त्याच बरोबर पाळीमधे त्रास होत असताना देखील संबंध ठेवून पत्नीला त्रास देत होता. त्यामुळे पत्नीने त्याच्यापासून दूर राहून मुलाला शाळेत घातले. कुटुंब न्यायालयात पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यावर पतीने वैवाहीक सबंध पुनर्स्थापित करण्यासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयाने अनैसर्गिक संबंध सिद्ध न झाल्याने घटस्फोट फेटाळला. पतीचा अर्ज चालू ठेवला. सदर निकालावर नाराज होत, पत्नीने उच्च न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला.

त्यावेळी पंजाब उच्च न्यायालयाने पत्नी आठ वर्ष विभक्त राहिली, याचे कारण समजणे गरजेचे आहे; सहज कुणी मूलबाळ असणारी स्त्री विभक्त राहत नाही. याशिवाय पत्नीने पती ज्या कंपनीमधे काम करतो, असे पतीने सांगितले, ती कंपनी बिहारमधे आहे. त्याच कंपनीचे पत्नी का नाव सांगत आहे? तिला पतीने ते सांगितले असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ती खरे बोलत असू शकते याचा विचार होणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अनैसर्गिक संबंध सिद्ध करणे अवघड बाब असते. न्यायालयानी त्याबाबत सर्व परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे. अनैसर्गिक संबंधामुळे जर स्त्रीला वेदना होत असतील अथवा इतर त्रास होत असेल, तर प्रत्यक्ष अनैसर्गिक सबंधासाठी पतीने जबरदस्ती केली हे सिद्ध करणे अपेक्षित नसून परिस्थीतीजन्य पुराव्यावरुन ती स्त्री पतीच्या क्रूरतेची शिकार झाली, असे गृहीत धरता येईल, असे स्पष्ट करुन पत्नीचा घटस्फोट मंजूर केला.

– ऍड. गणेश आळंदीकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)