अनैतिक संबंधातून “त्या’ महिलेचा खून

श्रीगोंदा, दि. 18 (प्रतिनिधी) – सविता नरके यांचा ज्या ट्रकमध्ये गळा आवळून खून केला तो ट्रक बेलवंडी पोलिसांनी जप्त केला आहे. एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधात आडवी येते म्हणून सविताचा गळा दाबून खून केला, अशी कबुली आरोपी कैलास नरके याने पोलिसांना दिली आहे.
बेलवंडी पोलिसांना चिखली घाटात सविता नरके यांचा मृतदेह सापडला होता. बेलवंडी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या खुनाचा उलगडा करत आरोपी कैलास नरके याला अटक केली. पोलीस तपासात त्याने पत्नीचा खून कोणत्या कारणातून केला याची माहिती दिली. नरके याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. गेल्या 10 वर्षांपासून या दोघांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. या महिलेशी असणारे संबंध सविता नरके यांना खटकत होते. त्यातूनच त्यांच्यामध्ये वादावादी व्हायची, अशी माहिती पोलिसांनी दिली.
रोजच वादावादी होत असल्याने कैलास नरके याने 9 मे रोजी अकोल्याला जायचे आहे असे सांगून पत्नी सविता हिला सोबत घेतले होते. मध्यरात्रीचा सुमार असल्याने त्याने ट्रक चिखली घाटात येताच गाडीत गाढ झोपलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली.
ज्या ट्रकमध्ये सविता नरके यांचा गळा आवळून खून करण्यात आला तो ट्रक बेलवंडी पोलिसांनी जप्त केला आहे. तपासी अधिकारी सचिन वांगडे म्हणाले की, आरोपी नरके याचे एका महिलेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्या महिलेचाही आम्ही जबाब नोंदविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)