अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

कोरेगाव तालुक्‍यातील पळशी येथील घटना : आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर
कोरेगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – पळशी, ता. कोरेगाव येथे पळशी-बिचुकले रस्त्यावर गुरुवारी दुपारी किरण संजय गायकवाड (वय 23, रा. बिचुकले (हल्ली रा. एकसळ, ता. कोरेगाव) याचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन त्याच गावातील राजेंद्र प्रकाश गायकवाड याने धारदार शस्त्राने मानेवर वार करुन खून केला. खुनाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राजेंद्र हा स्वतःहून वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मुळचा बिचुकले येथील रहिवासी असलेला किरण हा एकसळ येथे सासुरवाडीतच स्थायिक झाला होता. त्याच्यावर पत्नीचा जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल होता. मात्र, या गुन्ह्यात तो जामिनावर मुक्त होता. मोलमजुरी करुन तो उदरनिर्वाह करत होता. या खटल्याची सुनावणी सातारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु आहे. गुरुवारी त्याची तारीख नेमण्यात आलेली होती. तो न्यायालयात हजर राहिला होता. तेथून तो बिचुकले येथे गेला.
राजेंद्र प्रकाश गायकवाड व किरण संजय गायकवाड हे दोघे पळशी-बिचुकले रस्त्यावर आले होते. तेथे त्यांच्यामध्ये महिलेबरोबरच्या अनैतिक संबंधावरुन वादावादी झाली. त्याचे पर्यावसन भांडणात झाले. राजेंद्र याने रागाच्या भरात धारदार शस्त्राने किरण याच्या मानेवर वार करुन खून केला. त्यानंतर मृतदेह तेथेच टाकून तो वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. तेथील पोलीस कर्मचाऱ्यांना त्याने मी पळशीत किरण गायकवाड याचा खून केला आहे, असे सांगितले.
त्यानंतर वाठार स्टेशन पोलिसांनी खुनाची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यात कळविली. पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांच्यासह सातारारोड पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी पळशीकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून देण्यात आला.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, उपअधीक्षक सुहास गरुड यांनी भेट दिली व तपासकामी सूचना दिल्या. रात्री उशिरा कोरेगाव पोलिसांनी वाठार स्टेशन येथून संशयित राजेंद्र यास ताब्यात घेतले व घटनास्थळी नेले. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)