तळेगाव दाभाडे – पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पती, सासरा व दिराने मिळून एकावर चाकूने वार करत पाठीत मोठा दगड मारून एका तरुणाचा खून केला. ही घटना बुधवार (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता इंदोरी (ता. मावळ) येथे घडली.
भागुजी बाळू केदारी (वय 28, रा. ठाकरवस्ती, इंदोरी, ता. मावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भागुजी यांच्या पत्नी सुरेखा भागुजी केदारी (वय 25) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लक्ष्मण ऊर्फ खन्ना दादू केदारी (वय 25), दादू भिवा केदारी (वय 45), अरुण दादू केदारी (वय 22, सर्व रा. ठाकरवस्ती, इंदोरी) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण आणि दादू यांना ताब्यात घेतले आहे.
आरोपी लक्ष्मण याच्या पत्नीसोबत मृत भागुजी आणि त्याचा मित्र सुनील केवाळे या दोघांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी लक्ष्मण याला होता. त्याच संशयावरून आरोपींनी आपसात संगनमत करून बुधवारी रात्री साडेनऊ वाजता इंदोरी गावच्या हद्दीत इंदोरी-जांभवडे रोडवर बबन केदारी यांच्या घरासमोर भागुजी यांना गाठले. आरोपींनी भागुजी यांच्या पोटावर चाकूने वार केले. डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर मोठा दगड पाठीवर घालून भागुजी यांचा खून केला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी लक्ष्मण आणि त्याचे वडील दादू या दोघांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे तपास करीत आहेत.