अनुवाद हा मूळ लेखनाइतकाच महत्त्वाचा – डॉ.अरूणा ढेरे

‘कथांतर’ सारखे साहित्यिक​ उपक्रम सातत्याने एफटिआयआय मध्ये व्हावेत कारण साहित्य हा सिनेमाचा पाया – भूपेंद्र कैंथोला

पुणे : कलासक्त, पुणे आणि रेडिओ एफ.टी.आय.आय.९०.४ यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी “कथांतर” हा कथा अभिवाचन आणि पुस्तक परिचयाचा कार्यक्रम पुणेकर रसिकांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाला. “कथांतर : समकालीन जागतिक कथा” हे पुस्तक सुनंदा महाजन आणि अनघा भट यांनी संपादित केले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ते नुकतेच प्रकाशित केले आहे. “केल्याने भाषांतर” या नियतकालिकांमधील २० निवडक समकालीन कथा म्हणजे १९६० नंतरच्या कालखंडापासून ते आत्तापर्यंत प्रकाशित झालेल्या कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. जर्मन, रशियन, फ्रेंच, स्पॅनिश, जपानी, पोलिश अशा ६ भाषांमधील त्या कथा असून त्या १० वेगवेगळ्या देशांच्या साहित्याचे प्रतिनिधित्व करतात. या कथांचे १२ भाषांतरकारांनी त्या त्या भाषांमधून थेट मराठीत भाषांतर केले आहे.

यानिमित्ताने पुस्तक संपादिका सुनंदा महाजन व अनघा भट,प्रमुख पाहुण्या डॉ.अरूणा ढेरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अविनाश सप्रे यांचा तसेच शर्मिष्ठा खेर, निस्सिम बेडेकर, निलिमा रड्डी, नुपूर पोतनीस व उज्ज्वला बर्वे या भाषांतरकारांचा आणि अभिवाचक गजानन परांजपे यांचा सत्कार एफ्.टि.आय्.आय्.चे निदेशक श्री.भूपेंद्र कैंथोला यांचे हस्ते करण्यात आला. श्री.कैंथोला यांनी सिनेमा हा साहित्याच्या पायावरही उभा असल्याने इथं साहित्यिकांचा व साहित्यिक कार्यक्रमांचा राबता वाढावा अशी अपेक्षा व्यक्त केली आणि तो केवळ क्लासरूम पुरता मर्यादित न राहता पुणेकर रसिकांपर्यंत पोचण्यासाठी रेडिओ एफ्.टि.आय.आय. करत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. आज जणू काही साहित्य आणि समाज यांचा विवाह सोहळ्यात​ आल्याचे वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात प्रसिद्ध कवयित्री व समिक्षक डॉ.अरुणा ढेरे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना ‘कथांतर’ या पुस्तकातील कथांचे माफक संदर्भ सांगून वाचकांची त्या वाचण्याची उत्सुकता वाढेल अशा शैलीत रसग्रहण केले. भाषांतरीत कथा वाचताना त्यातील मराठी भाषा, बाज व आशय यांच्याशी समरस होता आले तर वाचायला आणखी मजा येते. ही दृष्टी येण्यासाठी त्यांचे बोलणे मार्गदर्शक होते. अध्यक्षस्थानावरून प्रसिद्ध समीक्षक अविनाश सप्रे यांनी सांगितले की केल्याने भाषांतर ने भाषांतराच्या बाबतीत दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, काहीजण साहित्य आणि संस्कृती मंडळाचे प्रकल्प घेतात पण काम करत नाहीत, पण कथांतर पुस्तकाचे काम वेळेत पूर्ण झाले, आणि हे पुस्तक सकस झाले आहे. एफ्.टि.आय.आय. सारख्या नामवंत ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमात उज्ज्वला बर्वे आणि गजानन परांजपे यांनी “रूदोल्फिओ” ही वलेंतिन रासपुतीन यांनी लिहिलेली रशियन कथा व दक्षिण अमेरिकी लेखिका इसाबेल आलेंदे यांची “दोन शब्द” (Dos Palabras) ही स्पॅनिश कथा प्रभावीपणे सादर केली. पुण्यातील मराठी रसिकांना जागतिक स्तरावरील साहित्य हे कथावाचनाद्वारे सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न रेडिओ एफ्.टि.आय्.आय्.ने या भारतीय नववर्षापासून आपल्या मासिक उपक्रमांद्वारे करण्यास सुरुवात केली आहे असे संजय चांदेकर यांनी सांगून या मागची भूमिका विशद केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)