अनुभव

भूमी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना आठवड्यातून एक दिवस शिकवायला जायचे असे मी ठरवले खरे, पण नोकरी सांभाळून हे काम मला जमेल का? अशी धास्ती देखील मनात होतीच. सोमवार ते शुक्रवार नोकरी असल्यामुळे शनिवार हा एकमेव पर्याय माझ्यासमोर होता. त्यातही दर शनिवारी जमेलच अशी खात्री देखील नव्हती. स्वयंसेवी संस्थेसाठी काम करायचे म्हणजे मानधनाचा तर प्रश्‍नच नाही. मनात अशा अनेक प्रश्‍नांनी गर्दी केलेली असतानाच मी मुलांना शिकवायला जायचे असा निर्णय घेतला आणि पुढे सलग सहा महिने प्रत्येक शनिवारी सुट्टी घेऊन मुलांना शिकवायला जाऊ लागलो. सोमवार ते शुक्रवार काम आणि शनिवारी स्वयंसेवक असा माझा दिनक्रम सुरु झाला. धावपळ तर होत होती मात्र आपणही या समाजासाठी काहीतरी करतोय याचा आनंद सुखावणारा होता. मुलांना शिकवायला खरोखरच खूप आनंद मिळत होता. सोमवार ते शुक्रवार आता शनिवारची वाट पाहण्यामध्ये जाऊ लागले होते. लहान मुलांसोबत मस्ती आणि अभ्यास यामध्ये वेळ कसा जात होता कळतच नव्हते.

मुलांना शिकवताना अनेक अविस्मरणीय अनुभव आले मात्र त्यातील एक अनुभव माझ्यासाठी खूपच मोलाचा आहे. एकदा मी आठवडाभर काम करून खूप कंटाळलो होतो. खर तर शनिवारी या मुलांना शिकावण्याचा कंटाळा पण आला होता. तेथे गेलो तर मुले अतिशय गोंधळ घालत होती. त्यांचा गोंधळ मी आवरण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते काही केल्या ऐकायला तयारच नव्हते. शेवटी संयमाचा बांध फुटला आणि एका मुलावर मी खूप जास्त ओरडलो. माझ्या रागामुळे तो मुलगा दुखावला जाईल असे मला दुसऱ्याच क्षणी वाटले पण मी तसे दाखवले नाही. दुसऱ्याच मिनिटाला तो मुलगा माझ्या जवळ येऊन आपुलकीने विचारू लागला, दादा, काय झाले तुम्हाला? डोकं दुखतंय का? काही त्रास होतोय का? त्याच्या या आपुलकीने, प्रेमळ संवादाने मी अक्षरशः गलबललो. कारण सुरुवातीला मला यातून काय मिळेल? असा प्रश्‍न माझ्या मनात होता, आणि आता जे प्रेम मला या मुलांच्या रूपाने मिळाले होते ते माझ्या पगारापेक्षाही मोठे होते, अमुल्य होते. प्रेमाचा हा अनमोल खजिना मला मिळाला होता.

माझ्या या स्वयंसेवी शिक्षकाच्या अनुभवांमधून मला एक खात्री मात्र नक्की पटली की आयुष्यामध्ये सर्वच कामांचा मोबदला हा पैशांमध्ये मिळत नसतो. काहीवेळेस हा मोबदला प्रेम, आपुलकी, आदर अशा जीवनाला परिपूर्ण भावणाऱ्या भावनांमधून मिळत असतो आणि हा मोबदला पैशांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ असतो.

– मारुती ढवळे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)