अनुपस्थित नगरसेवकांवर कारवाई नाही

पिंपरी – महापौर निवडणुकीसाठी भाजपने “व्हीप’ बजावून देखील निवडणुकीला अनुपस्थित राहणाऱ्या भाजपच्या तीन नगरसेवकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या तीनही नगरसेवकांनी समाधानकारक खुलासा सादर केला आहे, अशी माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली. शत्रुघ्न काटे, रवी लांडगे आणि तुषार कामठे अशी कारवाईपासून बचावलेल्या या भाजप नगरसेवकांची नावे आहेत.

महापौर नितीन काळजे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने यापदाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र, या पदाकरिता आमदार महेश लांडगे समर्थक राहुल जाधव यांना उमेदवारी जाहीर झाल्याने, दगाफटका होण्याची शक्‍यता लक्षात घेत भाजपने या निवडणुकीकरिता “व्हीप’ बजावला होता. या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौरपदी भाजपचे अनुक्रमे राहुल जाधव आणि सचिन चिंचवडे हे विजयी झाले. मात्र, हा व्हीप बजावून देखील या पदाकरिता तीव्र इच्छूक असलेले शत्रुघ्न काटे तसेच रवी लांडगे आणि तुषार कामठे तीन भाजप नगरसेवक या निवडणुकीला अनुपस्थित राहिले.

या तीनही नगरसेवकांच्या अनुपस्थितीची कारण संयुक्तिक असून, ती मान्य करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे शत्रुघ्न काटे हे रुग्णालयात उपचार घेत होते. तर रवी लांडगे हे शहराबाहेर गेले होते. याशिवाय तुषार कामठे यांच्या आजींचे निधन झाल्याने ते या निवडणूक कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. ही कारणे संयुक्तिक वाटल्याने या तीनही नगरसेवकांवर भाजपकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे एकनाथ पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)