अनुकंपधारकांचे 26 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन

न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार

सातारा – राज्यातील अनुकंपा धारकांना सरकार वेळोवेळी आश्‍वासने देवून आणि अंमलात न येणारे शासन निर्णय काढून फसवणूक करत आहे. सरकारच्या या कृतीच्या निषेधार्थ अनुकंपा धारक संघाच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदानावर सोमवार दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पासून अधिवेशन काळात हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
अनुकंपा पदभरतीमध्ये सुधारणा व तात्काळ करता यावी, यासाठी शासनाने वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली 20 जून 2015 रोजी पाच सदस्यीय समिती स्थापन केली. या समितीने आजवर बैठका घेण्यापलीकडे काहीच केले नाही. 9 जानेवारी 2017 रोजी मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्र्यांना तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले.

19 जुलै 2018 रोजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याचे स्मरण करुन दिले असता, त्यांनी उलट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून निर्णय घेण्याचे कळविले. 3 वर्ष उलटून गेले तरी काहीच निर्णय घेण्यात आला नाही. यावरुन अनुकंपा धारकांचा वाली कोण अशी भावना अनुकंपा धारकांमध्ये निर्माण झाली आहे.

अनुकंपा धारकांना नोकरीत सामावून घेण्यासाठी या आधी सुध्दा संघाच्यावतीने आंदोलने करण्यात आली. सामान्य प्रशासनचे राज्यमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली आ. प्रकाश आबिटकर व संघासोबत मंत्रालयात बैठकासुध्दा पार पडल्या. परंतू अद्यापपर्यंत आश्‍वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. 26 नोव्हेंबर पासून करण्यात येणारे आंदोलन निर्णय मिळेपर्यंत करण्यात येणार आहे.

अनुकंपधारक संघाचे मार्गदर्शक आ. प्रकाश आबिटकर, प्रदेशाध्यक्ष पंकज गाडेकर, कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रातून दस्तगिर शेख व विजय सुतार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार आहे. शासन सेवेत रुजू असताना मयत झालेल्या कर्मचाऱ्याच्या एका वारसाला नोकरीत सामावून घेण्याचे शासनाचे धोरण आहे. साधारणत: 2005 पासून राज्यातील 30 हजार अनुकंपा धारक वयोमर्यादेतून बाद झाले आहेत. तर बरेच होण्याच्या मार्गावर आहेत. अनुकंपा धारकांना विनाअट, सरसकट व तात्काळ नोकरीत सामावून घ्यावे व 23 एप्रिल 2008 चा शासन निर्णय पुन्हा काढावा. वयोमर्यादेतून बाद झालेल्यांच्या जागी दुसऱ्या वारसाचे नाव घ्यावे.

अनुकंपा धारकांना कंत्राटी पध्दतीने न घेता सरळ पदभरती करावी. अनुकंपा धारकांना पेसा कायदा लागू नसावा. 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसाला पेन्शन देण्यात यावी. आदी. मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये प्रदेश सचिव किशोर देशमुख, उपाध्यक्ष अविनाश भोसले, अक्षय ठाकरे, महिला अध्यक्षा लक्ष्मी मेश्राम, उपाध्यक्ष वैशाली बोदडे, प्रदेश सहसचिव आतिष सावळे, आदीसह राज्यातील सर्व खात्याचे अनुकंपा धारक उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)