अनिश भानवाला, तेजस्विनी यांना ऐतिहासिक सुवर्ण

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा : अंजुम मौदगिलला रौप्यपदकाचा मान

गोल्ड कोस्ट – केवळ 15 वर्षे वयाचा अनिश भानवाला आणि 35 वर्षीय अनुभवी नेमबाज तेजस्विनी सावंत यांनी नेमबाजीतील आपापल्या प्रकारांत ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावताना येथे सुरू असलेल्या 21व्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेतील भारताची घोडदौड कायम राखली. भारताची युवा नेमबाज अंजुम मौदगिलनेही रौप्यपदकाची नोंद करताना भारताला महिला गटांत दुहेरी यश मिळवून दिले.

-Ads-

या कामगिरीमुळे अनिशने भारताच्याच केवळ 16 वर्षे वयाच्या मनू भाकरचा विक्रम मोडून सर्वांत कमी वयाचा सुवर्णविजेता ठरण्याचाही मान मिळविला. मनू भाकरने याच स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सोनेरी यश मिळविले आहे. दरम्यान काल डबल ट्रॅप प्रकारांत सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या श्रेयसी सिंगने महिलांच्या ट्रॅप प्रकारातही अंतिम फेरी गाठताना दुहेरी मुकुटासाठी आपले आव्हान कायम राखले.

जागतिक ज्युनियर विजेता आणि कुमारांच्या विश्‍वचषक नेमबाजी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावणाऱ्या अनिश भानवालाने पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारांत सुवर्णपदकाला गवसणी घालताना स्पर्धाविक्रमाचीही नोंद केली. जागतिक नेमबाजी क्षेत्रातील वयाने सर्वांत लहान खेळाडू असलेल्या अनिशने पात्रता फेरीत 580 गुणांची सर्वोत्तम कामगिरी करून अंतिम फेरी गाठली होती. यामध्ये 22 वेळा त्याने अचूक लक्ष्यवेधही केला होता.अंतिम फेरीत जबरदस्त टेम्परामेंटचे दर्शन घडविणाऱ्या अनिशने आपल्या सर्व अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना चकित करताना 30 पैकी 30 गुणांच्या विक्रमी कामगिरीसह सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. ऑस्ट्रेलियाच्या सर्गेई एव्हग्लेव्हस्कीने 28 गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. तर इंग्लंडच्या सॅम गोविनला 17 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताचा आणखी एक नेमबाज नीरज कुमारचे आव्हान अंतिम फेरीत दुसऱ्या संधीला संपुष्टात आले.

तेजस्विनीचा दुहेरी धमाका

कालच महिलांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारांत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या तेजस्विनी सावंतने आज महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारांत थेट सुवर्णपदकाचाच लक्ष्यवेध केला. तेजस्विनीने अंतिम फेरीत पहिल्या शॉटपासूनच आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत अखेरीस 457.9 गुणांच्या स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदकाची निश्‍चिती केली. तेजस्विनीने नीलिंग प्रकारांत 152.4 गुणांची, प्रोनमध्ये 157.1 गुणांची नोंद करताना सिंगापूरच्या जस्मिन सेर शिआंग वेई हिचा 449.1 गुणांचा विक्रम मोडीत काढला. जस्मिनने ग्लासगो-2014 राष्ट्रकुल स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता. भारताच्या अंजुम मौदगिलने 455.7 गुमांसह रौप्यपदकाची निश्‍चिती केली. तर स्कॉटलंडच्या सेओनेड मॅकिन्टॉशने 444.6 गुणांसह कांस्यपदक पटकावले.

याआधी श्रेयसी सिंगने महिलांच्या डबल ट्रॅप प्रकारांत, हीना सिधूने महिलांच्या 25 मीटर पिस्तोल प्रकारांत, मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये, तसेच जितू रायने 50 मीटर पिस्तोल प्रकारांत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच तेजस्विनी सावंतने महिलांच्या 50 मी. रायफल प्रोन प्रकारांत, जितू रायने पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारांत, तर मेहुली घोषने महिलांच्या 10 मी. एअर रायफल प्रकारांत रौप्यपदक जिंकले आहे. तसेच अपूर्वी चांडेलाने त्याच प्रकारांत कांस्यपदक जिंकून भारताला दुहेरी यश मिळवून दिले.

   सायप्रस, नायजेरिया “टॉप टेन’मध्ये दाखल

गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आता 17 सुवर्णपदकासह, 10 रौप्य व 13 कांस्य अशा एकूण 40 पदकांची कमाई केली असून पदकतालिकेतील तिसरा क्रमांक कायम राखला आहे. यजमान ऑस्ट्रेलिया 65 सुवर्णांसह एकूण 165 पदके पटकावून अग्रस्थानी असून इंग्लंड 30 सुवर्णासह 98 पदके जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाने 13 सुवर्णांसह 69 पदके जिंकून चौथा क्रमांक राखला असून दक्षिण आफ्रिका (12 सुवर्णांसह 34 पदके) आणि न्यूझीलंड (10 सुवर्णांसह 33 पदके) यांनी पदकतालिकेत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकाची अदलाबदल केली आहे. सातव्या स्थानावरील स्कॉटलंडनंतर (9 सुवर्णांसह 40 पदके) सायप्रसने (8 सुवर्णांसह 13 पदके) वेल्सला (7 सुवर्णांसह 29 पदके) मागे टाकून आठव्या स्थानावर प्रगती केली आहे. तसेच नायजेरियाने (7 सुवर्णांसह 17 पदके) जमैकाला (4 सुवर्णांसह 16 पदके) मागे टाकून पहिल्या 10 क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)