अनाथांचा नाथ – गोपीनाथ!

गेली सहा वर्षे आपल्या स्पर्श ट्रस्टच्या माध्यमातून बंगलोरच्या गोपीनाथ आर. या सेवाभावी वृत्तीच्या युवकाने सुमारे 2500 अनाथ व दुर्लक्षित बालकांना शिक्षणाशी जोडण्याचे महनीय काम केले असून, त्याबद्दल त्याला सन 2017 चा यशवंतराव केळकर युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजातील प्रत्येक बालकाला मूलभूत शिक्षणासह सुरक्षित व सुखकर बालपण लाभावे याच उद्देशाने गोपीनाथ यांनी स्पर्श ट्रस्टची स्थापना केली आहे.

आर. गोपीनाथ मूलतः कर्नाटकच्या कोलारजवळील एका खेड्यात राहणारा चार भावंडांमध्ये सर्वात धाकटा मुलगा. वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे गोपीनाथ व त्यांच्या भावंडांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. शेतीची धुळदाण झाल्यावर गोपी व त्यांच्या अन्य तीन भावंडांना झोपडीत राहून आईच्या मोलमजुरीच्या कामात मदत करावी लागत असे. लहान गोपी गावातील गुरांची निगा राखणे गाईंच्या गोठ्याची सफाई अशी कामे करीत असे.

-Ads-

गोपी ज्या घरांमध्ये अशी कामे करीत असे तेथील मुलांना शाळेत जाताना पाहून गोपीला आपण पण त्यांच्याप्रमाणे शाळेत जावेसे वाटायचे पण त्याचे स्वप्न घरच्या आर्थिक स्थितीमुळे अपूर्णच राहिले. मात्र, गोपीनाथच्या सावत्र आईने घरच्या हलाखीच्या व विपरीत परिस्थितीत पण बाळ गोपीची शिकण्याची जिद्द पाहून त्याचे नाव शाळेत घातले व त्यामुळे त्याचे सारे जीवनच बदलून गेले. शाळेपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यावर समाजातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काहीतरी ठोस करावे या उद्देशाने गोपीनाथने समाजकल्याण विषयातील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. नंतर गोपीनाथने बंगलोर येथे ‘एसडब्ल्यूएपी’ म्हणजेच सोशल वर्कर असोसिएशन फॉर पीपल या सेवाभावी संस्थेद्वारे सामाजिक काम करण्यास सुरुवात केली. सन 2002 मध्ये “स्वॅप’ची स्थापना केल्यावर गोपीनाथने भर दिला तो शिक्षणापासून कौटुंबिक-आर्थिक कारणांनी वंचित राहिलेल्या मुलांच्या शिक्षणावर. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला बंगलोरच्या झोपडपट्टीवजा शाळांमध्ये जाऊन आर्थिक वा घरगुती अडचणींमुळे शाळा सोडणाऱ्या व पुढील शिक्षण न घेऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा केली. मग विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संपर्क-संवाद साधला. त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन वा आर्थिक मदत केली. गोपीनाथने नंतर अल्पबुद्धी, मतिमंद, कुपोषित-आजारी विद्यार्थ्यांनाही मदत सुरु केली.

– दत्तात्रय आंबुलकर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)