अनब्रेकेबल… मेरी कोम

आपण इतिहास रचावा म्हणून इतिहासानेही आपली वाट पाहावी आणि तो सुवर्ण इतिहास रचण्याचा दिवस उजाडावा. संपूर्ण जग आपल्या ऐतिहासिक कामगिरीचे साक्षीदार बनून ज्यावेळी आपला आनंद साजरा करीत असते त्यावेळी आपण त्या आनंदाचे कारण ठरण्यात जो काही आनंद मिळतो, तो केवळ शब्दातीत असतो. बॉक्‍सिंगमध्ये जागतिक सहा सुवर्ण पदक जिंकून संपूर्ण देशवासियांना असाच आनंद देणारी जगातील विश्‍वविक्रमी महिला बॉक्‍सर म्हणजे मेरी कोम.

ईशान्य भारताची असल्यामुळे तिला लोकांच्या चुकीच्या बोलण्याला अनेक वेळा सामोरे जावे लागले. मात्र, तिने माय हार्ट फुल ऑफ इंडिया म्हणत कधीही त्यांना प्रतिउत्तर दिले नाही. ती सातत्याने आपली कामगिरी सुधारत खेळत राहिली. आज तिच्यामुळे जगभरामध्ये भारताचे नाव अभिमानाने घेतले जात आहे. आपण जिंकलो असतानाही आपल्या प्रतिस्पर्ध्याला हरण्याचे झालेले दु:ख पाहून, त्याची माफी मागणारी एम.सी. मेरी कोम ही खिलाडूवृत्ती जपणारी एक आदर्श खेळाडू आहे.

आपण गरीब आहोत, केवळ या एकाच कारणामुळे आपल्याला कोणीही बोलवत नाही. आपल्याला सर्वजण बोलवतील, आपले एक स्वतःचे राहण्यायोग्य घर असावे इतकेच काय ते स्वप्न उराशी बाळगत मेरी आपले बालपण जगत होती. गरीब आणि शेतकरी कुटुंबात जन्म होणे म्हणजे केवळ कारणे सांगत परिस्थिती पुढे ढकलणे नसून, प्रचंड मेहनत घेत आलेल्या प्रतिकूल प्रसंगातून मार्ग काढत अपेक्षित उंचीवर पोहचणे आहे. हे मेरी कोमने आपल्या स्वत:च्या उदाहरणातून सिद्ध केलेले आहे. तिने आपल्या परिस्थितीला कधीही आपल्यावर स्वार होऊ दिले नाही. उलट ती आपण गरीब आहोत म्हणून अधिक मेहनत घेत, स्वत: स्वत:च्या वाटा निवडत आपला यशस्वीतेचा मार्ग तयार करत गेली. तू मुलगी आहेस, तू काहीही करू शकत नाहीस म्हणून मेरीला नावे ठेवणाऱ्या त्या असंख्य पुरूष मंडळींना आयुष्यभर प्रेरणा देऊन उरेल इतके उत्तुंग कर्तुत्व तिने स्व:कष्टावर आज मिळविलेले आहे.

पहिली बॉक्‍सिंगची स्पर्धा खेळायला जात असताना बसमध्ये जागा नसल्यामुळे बसच्या वर बसून स्पर्धेला जाणारी मेरी आज जगभरामध्ये अभिमानाने प्रवास करते. आज तिला जागा मिळण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही तर तिच्यासाठी खास जागा राखीव असते. हे सगळे शक्‍य झाले तिच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे. मी हे करू शकते तर आपणही खेळामध्ये यशस्वी होऊ शकता. आपण खेळामध्ये खुप चांगल्याप्रकारे घडू शकता, देशासाठी महत्वपूर्ण असे योगदान देऊ शकता असे तरूणांना सांगत ती आज संपूर्ण देशासाठी प्रेरकशक्ती बनलेली आहे.

मणिपूरच्या छोट्याशा गावातून सुरू झालेला मेरीचा प्रवास आज संपूर्ण विश्‍वाने तिच्या कर्तुत्वाची दखल घेण्यापर्यंत येऊन पोहचला आहे. यामध्ये तिच्यातील आत्मविश्‍वास, प्रचंड मेहनत घेण्याची वृत्ती तसेच आपल्या ध्येयावर असलेले पूर्ण लक्ष, सातत्यपूर्ण सराव, शिस्तप्रिय आयुष्य, नियोजन या गुणांचा मोलाचा वाटा राहिला आहे. मातृत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत, आपल्या तीन मुलांचा सांभाळ करीत, वयाची पस्तीशी गाठल्यानंतरही बॉक्‍सिंग सारख्या खेळामध्ये फिटनेस आणि कौशल्य जपत ती आजही सर्वांना हेवा वाटावा अशी कामगिरी करीत आहे. स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्‍वास असेल तर कोणीही ऐतिहासिक कामगिरी करू शकते हे मेरी कोमने सहा वेळा विश्‍वविजेती ठरून सिद्ध केले आहे. 2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018 अशी सहा जागतिक सुवर्ण पदके जिंकणारी ती जगातील पहिली महिला बॉक्‍सर ठरली आहे. माझे यश हे भारत देशाला अर्पण करते. मी स्वत: खेळत राहीन आणि देशासाठी खेळाडू घडविण्याचा ध्यास नेहमी बाळगून असेल असे म्हणत मेरी आजही सकारात्मकपणे लढण्याची तयारी ठेवते. तिच्या या संघर्षामध्ये तिला परिवाराची खूप मोठी साथ लाभली आहे. सहा वेळा बॉक्‍सिंग जगज्जेती ठरलेली मेरी कोमचे आता संपूर्ण लक्ष आहे 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेवर. ती या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देत पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरी करेल या विश्‍वासासह तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.

– श्रीकांत येरूळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)