अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या बोटी पाण्यात बुडविल्या 

कर्जत – नगर आणि पुणे जिल्ह्याच्या संयुक्त महसुली हद्दीचा गैरफायदा घेत, भीमा नदीपात्रातून अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या सहा बोटी जिलेटिनच्या स्फोटाने उडवून देत नदीच्या पाण्यात बुडविण्यात आल्या. यामध्ये इतर बोटींचेही नुकसान झाले. कर्जत व दौंड तालुका महसूल प्रशासनाने संयुक्‍तपणे केलेल्या या धडक कारवाईने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
भीमा नदी पात्राच्या कर्जत, दौंड, इंदापूर या तीनही तालुक्‍यांच्या हद्दीत ठिकठिकाणी वाळू तस्करांनी आपले चांगलेच बस्तान बसविले आहे. कर्जत तालुक्‍यातील जलालपूर, देऊळवाडी, सिद्धटेक, बेर्डी आदी भागात तर दौंड तालुक्‍यातील शिरापूर, हिंगणी, मलठण, नायगाव, राजेगाव, वाघलूज आदी भागात वाळू तस्कारांनी रात्रंदिवस उच्छाद मांडलेला आहे. यांत्रिक बोटींद्वारे दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडवून हजारो ब्रास अनधिकृत वाळूउपसा केला जात आहे. या उपशामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त वाळू वाहतूक होत असल्याने डांबरी रस्त्यांची वाट लागली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने दर्शनासाठी येणारे भाविक, शालेय विद्यार्थी, शेतमाल व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .
या पार्श्‍वभूमीवर कर्जत व दौंड तालुका महसूल प्रशासनाने मंगळवारी संयुक्‍तपणे ही कारवाई केली. अनेक वाळू तस्करांनी आपल्या बोटी नदीकाठच्या जंगलातील ओढ्यात लावल्या होत्या. तेथे जाऊन अधिकाऱ्यांनी जिलेटीनच्या स्फोटाद्वारे बोटी फोडून नदीत बुडविल्या. या संयुक्त कारवाईत दौंडचे प्रांताधिकारी संजय अस्वले, तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी महत्वाची भूमिका बजावली. यावेळी कर्जतच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे व तहसीलदार किरण सावंत पाटील हजर नव्हते. या पथकामध्ये कर्जतमधून सर्कल बाळासाहेब सूर्यवंशी, मोहसिन शेख, तलाठी नंदकुमार गव्हाणे, कालीचरण मखरे, विश्वास राठोड, धुळाजी केसकर, बळीराम पांडुळे, सदाशिव गावडे, उजनी कालवा निरीक्षक इम्रान शेख, तर दौंड तालुक्‍यामधून सर्कल शिवाजी खारतोडे, दीपक कोकरे, प्रकाश भोंडवे, विनोद धांडोरे उपस्थित होते. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने उजनी धरण व्यवस्थापनाला अनधिकृत वाळूउपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. मात्र त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे वाळू माफिया पोसले जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)