अनधिकृत मोबाईल टॉवर फेर सर्वेक्षणाचा घाट

खोटी कागदपत्रे सादर करणाऱ्या कंपनीवर कारवाईची मागणी

पुणे – महापालिकेकडून चार वर्षांपूर्वी शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचे सर्वेक्षण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले असताना बांधकाम विभागाकडून पुन्हा एकदा लाखो रुपये खर्चून सर्वेक्षण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. हे काम मिळविण्यासाठी या निविदा प्रक्रीयेत सहभागी झालेल्या “नक्षत्र सर्विसेस’ या कंपनीने खोटी कागदपत्रे सादर केली असून या कंपनीवर पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच, अनावश्‍यक या कामावर लाखो रुपये खर्च करण्याचा घाट घातला जात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

-Ads-

शहरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभारले आहेत. अशा टॉवर्सला महापालिकेने तीन पट दंड आकारला असून अनेक टॉवर कंपन्या न्यायालयात गेल्या आहेत. याबाबत गेल्या काही वर्षांत वारंवार प्रश्‍न उपस्थित केले जात असल्याने मिळकतकर विभागाने 4 वर्षांपूर्वी या सर्व टॉवर्सचे सर्वेक्षण केले होते. त्यासाठी 3 कोटी 70 लाखांचा खर्चही केला असून सर्वेक्षणाच्या माहितीच्या आधारावर 100 कोटींची वसुली प्रशासनाने आतापर्यंत केली असून अद्यापही 600 कोटींची थकबाकी आहे. तसेच, या कंपनीने कामाचा अहवालही सादर केला असून प्रशासनाकडून त्यानुसार, पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत असताना, त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा नव्याने सर्वेक्षण करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी दोनवेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून त्यात आलेल्या एकाच कंपनीने या कामासाठी पालिकेस सादर केलेली अनुभवाची कागदपत्रे खोटी असल्याचा दावा बागवे यांनी केला आहे. तसेच, हे सर्वेक्षण करण्याचे काम मिळकतकर विभागाकडून होणे आवश्‍यक असताना त्यासाठी बांधकाम विभागाने पुन्हा निविदा काढण्यासाठी का पुढाकार घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, याबाबत केलेल्या तक्रारीनंतर या नवीन निविदा प्रक्रिया आपल्या तक्रारीनंतर रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आल्याचे बागवे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)