अनधिकृत मंडपांवर कारवाई टाळणे भोवणार?

आज सुनावणी : पाच जणांना प्रशासनाची नोटीस

पुणे – गणेशोत्सवात अनधिकृतपणे मंडप उभारण्यात आले. त्या संबंधितांवर कारवाईसाठी टाळाटाळ करणाऱ्या पाच महापालिका सहायक आयुक्तांची माहिती उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. महापालिकेने या अधिकाऱ्यांना नोटीस बजावत खुलासा मागविला असून तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.

-Ads-

याबाबतची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने दिली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, उत्सव काळात मंडप उभारणाऱ्या मंडळांची माहिती जिल्हा प्रशासनानकडे होती. त्यांच्या तपासणीसाठी चार पथके तयार करण्यात आली होती. उत्सवाच्या सहा दिवसआधीच ही तपासणी बंधनकारक होती. या पथकांनी 601 मंडळांची तपासणी केली. त्यात 61 जणांनी परवानगी घेतली नसल्याचे समोर आले. त्यांची यादी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली. त्यानुसार, मंडळांनी महापालिका तसेच पोलिसांची परवानगी का घेतली नाही, याची फेरतपासणी केली असता सुमारे 49 मंडळांनी परवाण्यासाठी अर्ज केल्याचे समोर आले. तसेच त्यांना पालिकेनेही परवाना दिला.

तर, 12 मंडळांनी परवानगी घेतली नसल्याचे समोर आल्याने त्यांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आली. त्यात औंध-बाणेर-बालेवाडी, शिवाजीनगर-घोले रस्ता, ढोले-पाटील रस्ता, धनकवडी तसेच सिंहगड रस्ता क्षेत्रीत कार्यालयांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या हद्दीतील या मंडळांवर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, ही कारवाई त्यांनी केली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशालाच अधिकाऱ्यांकडून हरताळ फासण्यात आला असून अनधिकृत मंडपांबाबत न्यायालयाच्या भावना तीव्र असल्याने या सुनावणीकडे लक्ष लागून आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)