अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई

पुणे, दि. 20 (प्रतिनिधी)-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्‍यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मोई (ता. खेड) येथील आठ व्यापारी गाळे व आठ रहिवासी गाळे असे एकूण चार हजार 500 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.

पीएमआरडीए कडून अनधिकृत बांधकामांवर कारवाईची व्याप्ती वाढविली असून प्राधिकरणाच्या हद्दीतील खेड तालुक्‍यातील मोई येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. अनधिकृत बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावूनही त्याकडे विठ्ठल करपे याने त्याकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवले. मोई येथील सर्व्हे नंबर 462 येथील अनधिकृत बांधकामास मार्च 2017 मध्ये नोटीस बजावली होती. परंतू करपे यांनी त्यास कोणतेही उत्तर दिले नव्हते. त्यामुळे नोटीसीनुसार कारवाईस अंतिम स्वरूप देण्यात आले.

प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्य अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, तहसिलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, पोलिस निरिक्षक मनोज यादव यांच्या उपस्थित कारवाई करण्यात आली.

खेड तालुक्‍यातील अनधिकृत बांधकामांवर प्राधिकरणाने केलेली ही पहिलीच कारवाई होती. दरम्यान प्राधिकरणाने खेड परिसरात अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. यापूर्वी सुमारे 153 अनधिकृत बांधकामांना प्राधिकरणाने नोटीसा दिल्या आहेत. एमआयडीसी औद्योगिक क्षेत्राबाहेर मोठ्या प्रमाणावर अनियमितपणे निवासी व्यापारी व औद्योगिक बांधकामे होताना दिसत असून प्राधिकरणाकडून अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

पीएमआरडीए च्या कार्यक्षेत्रात कोणतेही घर खरेदी करण्यापूर्वी संबधित बांधकामाला प्राधिकरणाची बांधकाम परवानगी व अकृषिक परवानगी आहे का, याची खात्री करूनच घर खरेदी करावी. तसेच अनधिकृत बांधकामांची माहिती सुरुवातीच्या टप्प्यावरच प्राधिकरणास कळवावी, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)