अनधिकृत इंग्रजी शाळा बंद होणार

शिक्षण विभागाच्या विशेष पथकामार्फेत तपासणी

– डॉ. राजू गुरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे – पुण्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळा सुरू करण्यात आल्या असून या अनधिकृत शाळांची शिक्षण विभागाच्या विशेष पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत दोषी आढळल्यास शाळा बंद करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याकडे शैक्षणिक संस्थांचा कल वाढू लागलेला आहे. राजकीय पुढारी, सामाजिक संस्था, उद्योजक व व्यापारी यांनीही नवीन शाळा सुरू करण्याचा धडाका लावला आहे. बऱ्याचशा शाळा या खासगी निवासी इमारती व बंगल्यांमध्येच सुरू करण्यात आलेल्या आहेत. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने प्रवेशही घेतल्याचे आढळून येते.

कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची व संबंधित शैक्षणिक बोर्डाची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. शिक्षण विभागाकडून याबाबत दरवर्षी सूचना दिल्या जातात. मात्र, या सूचनांची काही जणांकडून फारशी गांभीर्याने दखलच घेण्यात येत नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. प्रामुख्याने शहराच्या उपनगरांमध्ये व ग्रामीण भागात अनधिकृत शाळा सुरू असल्याचे आढळते. शाळा अधिकृत आहे की अनधिकृत आहे याबाबत पालकांना फारशी माहितीच संस्थांकडून दिली जात नाही. अचानक शिक्षण विभागाने शाळांवर कारवाई केल्यानंतर पालकांचे डोळे उघडतात. त्यानंतर इतर शाळांमध्ये प्रवेशासाठी धावाधाव करावी लागते.

बहुसंख्य इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये फारशा सुविधा उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांकडून सर्रासपणे भरमसाठ शुल्क वसूल केली जात असल्याचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. शासनाकडून शुल्काबाबतची नियमावली ठरवून देण्यात आलेली आहे. मात्र, काही शाळांकडून जाणूनबुजून याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जातात. त्याची दखल घेऊन शिक्षण विभागाकडून कधी कधी कारवाईही केली जाते. दरम्यान, पालकांनी अथवा पालक संघांनी योग्य पुराव्यासह तक्रारी दाखल केल्यास संबंधित शाळांवर कडक कारवाई करण्याचे धोरण निश्‍चितपणे राबविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

अनधिकृत शाळांबाबत तक्रारींची दखल
आता नवीन वर्षातही शिक्षणाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, निरीक्षक यांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत शाळांची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. यात शाळांच्या परवानगीची कागदपत्रे तपासण्यात येतील. पालकांनी अनधिकृत शाळांबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्यास त्याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी जागृत राहून अधिकृत शाळांमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश घेणे आवश्‍यक आहे, असे पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)