अध्यक्षीय संघाचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

पहिला डाव 6 बाद 360 धावांवर घोषित 
बडोदा – अंकित बावणेचे नाबाद शतक आणि मयंक आगरवालची शानदार खेळी यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध एकमेव सराव सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर अध्यक्षीय संघाने आपला पहिला डाव 6 बाद 360 धावांवर घोषित करून आजच्या दिवसावर वर्चस्व गाजविले. वेस्ट इंडीजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला असून आपल्या आगामी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी हा एकमेव सराव सामना खेळणार आहे. अंकित बावणेने 191 चेंडूंत 15 चौकारांच्या मदतीने नाबाद 116 धावा केल्या.

कर्णधार करुण नायरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि हनुमा विहारी स्वस्तात परतल्याने अध्यक्षीय संघाची दोन बाद 40 अशी अवस्था झाल्यामुळे हा निर्णय त्यांच्या अंगलट आला होता.. यावेळी दुसरा सलामीवीर मयंक अग्रवालने करुण नायरच्या साथीत सावध फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. नायर आणि आगर्रवाल यांनी संघाला शंभरी पार करून देताना शतकी भागीदारीकडे वाटचाल केली. मात्र, संघाच्या 132 धावा झाल्या असताना मयंक आगरवाल बाद झाला. आगरवालने 111 चेंडूत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 90 धावांची खेळी करताना नायरच्या साथीत 20.4 षटकांत 92 धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

आगरवाल बाद झाल्यानंतर 12 धावांची भर घालून करुण नायरदेखील परतला. नायरने 60 चेंडूंत 29 धावांची खेळी केली. जम बसवलेली जोडी तंबूत परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी संघाचा डाव सावरला. यावेळी अय्यरने वेगवान, तर बावणेने सावध फलंदाजी करत संघाला 200 धावांचा टप्पा पार करून दिला. तसेच अय्यरने आपले अर्धशतक पूर्ण करताना संघाला 250 धावांचा टप्पा गाठून दिला. मात्र, संघाच्या 258 धावा झाल्या असताना अय्यरला बाद करत बिशूने ही जमलेली जोडी फोडली.

 

अय्यरने 64 चेंडूंत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करताना बावणेच्या साथीत 25.2 षटकांत 113 धावांची भागीदारी केली. बावणेने एक बाजू लावून धरताना संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. दुसऱ्या बाजूने खेळणारा समित पटेल केवळ 15 धावा करून परतल्यावर बावणेने जलज सक्‍सेनाला साथीत घेऊन संघाला 350 धावांचा टप्पा पार करून दिला. दरम्यान बावणेने आपले शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अध्यक्षीय संघाने आपला डाव 90 षटकांत 6 बाद 360 धावांवर घोषित केला. वेस्ट इंडीजकडून देवेंद्र बिशूने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर शेनॉन गॅब्रिएलने दोन गडी बाद करताना त्याला सुरेख साथ दिली.

संक्षिप्त धावफलक –
अध्यक्षीय संघ – पहिला डाव – 90 षटकांत 6 बाद 360 घोषित (अंकित बावणे नाबाद 116, मयंक आगरवाल 90, श्रेयस अय्यर 61, देवेंद्र बिशू 104-3, शेनॉन गॅब्रिएल 41-2, शेर्मन लुईस 13-1).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)