अध्यक्षांवरील अविश्वास ठरावावरून विधानसभेत गदारोळ

तीनवेळा कामकाज तहकूब

मुंबई – विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरुन सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभेच्या इतिहासातील कधीही न झालेले असे चुकीचे कामकाज करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर आम्ही केलेले कामकाज हे नियमानुसार आणि प्रथा परंपरेनुसारच केले असल्याचे सांगत आम्हीच बरोबर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या गदारोळात सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करण्यात आले. दरम्यान, विलासराव देशमुखांच्या वेळी जे योग्य होते तेच आताही योग्य आहे, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्र्यांनी या वादावर पडदा टाकला.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अध्यक्षांवरील अविश्वास ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी कृती केली ती म्हणजे लोकशाहीला काळीमा फासण्याची कृती आहे. अध्यक्ष जर मनमानी पद्धतीने कामकाज करून सरकारला सहाय्य करीत असतील तर अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव आणण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे विखे-पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाची कोणतीही चर्चा न करता सत्ताधाऱ्यांनी विश्वास दर्शक ठराव आणून नियमाची पायमल्ली केली आहे.

2006 ला विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मंत्रीमंडळावरील विश्वासदर्शक ठराव मांडला होता. त्यांनी अध्यक्षांच्या बाजूने ठराव मांडला नव्हता. आता आम्ही अध्यक्षांच्या विरूद्ध ठराव मांडला आहे. त्यामुळे 2006 ची आणि आताची तूलना होऊ शकत नाही असे सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जोरदार टीका केली. विधानसभा अध्यक्षांच्या विरूद्ध अविश्वास ठराव आणत असतांना नियमानुसार कामकाज होणे अपेक्षित आहे. अध्यक्षांनी 14 दिवसानंतर अविश्वास ठराव आणण्याची आवश्‍यकता होती. मात्र विधानसभा अध्यक्षांनी अजूनही आमचा प्रस्ताव सभागृहात आणलेला नाही. अध्यक्षांनी चूकीच्या पद्धतीने कामकाज करू नये दिलीप वळसे पाटील म्हणाले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांनी या सरकारवर टीका केली.

विरोधकाच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी सभागृहात निवेदन केले. ते म्हणाले की, आम्ही जे कामकाज करीत आहोत ते नियमानुसार असून त्यामध्ये कोणतेही चूकीचे काम केलेले नाही. तसेच हा प्रश्न निकाली निघाला आहे. विलासराव देशमुख यांनी 2006 मध्ये ज्या पद्धतीने विश्वासदर्शक ठराव मांडला त्याच पद्धतीने आम्ही अध्यक्षांच्या विरोधात विश्वास दर्शक ठराव मांडला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. मंत्रिमंडळावरील अविश्वासासाठी 2 दिवसाची मुदत आहे आणि अध्यक्षांसाठी 14 दिवसाची मुदत आहे एवढाच काय तो फरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे विलासराव देशमुखांच्या वेळी जे योग्य होते तेच आताही योग्य आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन केल्यानंतर विरोधी पक्षांतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यामुळे सुरूवातीला 10 मिनिटांसाठी आणि त्यानंतर अध्रया तासासाठी व 15 मिनिटांसाठी असे तीनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)