अधिकाऱ्यांना लागतेय “चिरीमिरी’?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकाम किंवा बेकायदा टपरी-स्टॉलधारकांवर कारवाईचा धडाका लावला आहे. प्रशासनाने अवैध बांधकाम व व्यावसायावर कारवाईची दमदार “कामगिरी’ सुरू केली असली, तरी काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना “चिरीमिरी’मध्ये “रस’ आहे. परिणामी, बेकायदेशीर असलेले काही फ्लेक्‍स आणि टपऱ्या राजरोस सुरू आहेत. पण, “चिरीमिरी’ न देणाऱ्यांच्या व्यावसायावर “बुलडोझर’ फिरवला जात आहे, अशा तक्रारी नागरिकांमधून केल्या जात आहेत.

महापालिकेच्या अ-प्रभाग कार्यालयाअंतर्गत बुधवारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. चिंचवड डी-मार्ट येथील पत्राशेड, लालटोपीनगर-मोरवाडी येथील जुने फर्निचरचे साहित्य, नाना-नानी पार्क येथील एक टपरी आणि तीन हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यासाठी दहा पोलीस कर्मचारी, अ-प्रभागाचे आठ कर्मचारी, फ-प्रभागाचे अतिक्रमण विरोधी पथक, दोन जेसीबी, क्रेन आणि टॅंकरच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अरुण सोनकुसरे यांनी दिली. मात्र, अ-प्रभागातील काही अधिकारी अवैध फ्लेक्‍स कारवाई करताना सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरीत आहेत, अशी टीका व्यवसायिकांमधून होताना दिसत आहे. शहर विद्रुपीकरणाला प्रतिबंध व्हायलाच पाहिजे. मात्र, कारवाई करताना दुजाभाव नको, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

दुसरीकडे, अतिक्रमण विभागातील काही अधिकारी दत्तनगर, विद्यानगर, शाहुनगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर आदी परिसरात कारवाई दरम्यान “अर्थपूर्ण’ कामगिरी करताना दिसत आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “चिरीमिरी’ दिल्यावर टपरी अथवा स्टॉलला “अभय’ दिले जाते. मात्र, नियमावर बोट ठेवून सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जाते, असा संताप व्यक्‍त होत आहे.

दरम्यान, पिंपरीतील, डॉ. वाय. पाटील महाविद्यालयाच्या पदवी प्रदान समारंभ गुरुवारी (दि. 29) उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पालिकेच्या “ह’ प्रभागाच्या अतिक्रमण विभागाने संत तुकारामनगर डॉ. डी. वाय. पाटील रोडवरील अनधिकृत टपऱ्या आणि पत्राशेडवर कारवाई केली. त्यावेळी कारवाईला विरोध करणाऱ्या एका टपरी चालकाला अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी धक्काबुक्की केली. यामध्ये हृदयविकाराचा झटका येवून रवी तायडे यांचा मृत्यू झाला. तायडे यांची याठिकाणी रद्दी खरेदी विक्रीचे दुकान होते. अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे वेळ मागितला होता. तरीपण, कारवाईला सुरवात केली. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असा अरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मध्यंतरी, पिंपळे गुरव येथील अतिक्रमण कारवाई दरम्यान एका महिलेने इमारतीवरुन उडी मारली होती. या दुर्घटनेत संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. अतिक्रमण कारवाईला विरोध करताना मृत्यू ओढावून घेतल्याची पिंपरीतील दुसरी घटना ठरली आहे. त्यामुळे अतिक्रमण कारवाई करताना बड्या लोकांशी हात मिळवणी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या संसार, व्यवसायावर बुलडोझर, अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे.

आम्ही काळजी घेतो पण…
महापालिकेचे सह शहर अभियंता राजन पाटील यांना अतिक्रमण कारवाई दरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनेसंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, अतिक्रमण कारवाई कधीच ऐनवेळी केली जात नाही. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवले जाते. सर्व गोष्टींचा अंदाज घेवूनच कारवाई केली जाते. “आता उठलो आणि कारवाई सुरू केली…’ असे होत नाही. महापालिका प्रशासन सर्वोतोपरी काळजी घेत आहे. पण, तरीही अतिक्रमण कारवाई दरम्यान अनुचित प्रकार घडतो. कारवाईसाठी पोलीस दलाचे मनुष्यबळ कमी आहे, असे सांगितले जाते. मात्र, पिंपरीतील कारवाई दरम्यान महापालिका अधिकारी आणि पोलिसांनी संबंधित व्यक्‍तीला धक्‍काबुक्‍की केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कारवाई दरम्यान काळजी घेण्यात प्रशासन कमी पडतेय का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

अ-प्रभागाचा “दिव्याखाली अंधार’?
अ-प्रभाग कार्यालयाच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण कारवाईचा धडाका सुरू आहे. मात्र, प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हातगाडी, टपरी आणि रसवंतीची दुकाने फूटपाथवरच उभारण्यात आली आहेत. मात्र, संबंधित अतिक्रमणांवर कारवाई करण्यास “कानाडोळा’ केला जात आहे. पण, ठिकठिकाणच्या व्यावसायिकांना फ्लेक्‍सवरुन वेठीस धरले जात आहे, अशी टीका सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

बंदच्या दिवशी अतिक्रमण कारवाई?
अतिक्रमणाच्या बजबजपुरीमुळे पिंपरी कॅम्प परिसर कायम वाहतूक कोंडीने ग्रासलेला आहे. मात्र, महापालिकेकडून या अतिक्रमणांकडे डोळेझाक होते. विशेष म्हणजे मंगळवारी पिंपरी कॅम्प परिसर बंद असतो. या दिवशी याठिकाणी चिटपाखरुनही फिरत नाही. मात्र, महापालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण पथक बंदच्या दिवशी या ठिकाणी “घिरट्या’ घालत असल्याचे मंगळवारी (दि. 29) पहायला मिळाले. याच मंगळवारी नव्हे तर दर मंगळवारी असेच चित्र या ठिकाणी असते. या तत्परतेबद्दल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे “कौतुक’ करावे तेवढे थोडे असल्याची टीका स्थानिक व्यापारी करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)