अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने माण नदीत वाळू चोरी

नगराध्यक्ष तुषार विरकर यांचा आरोप : वाळूचोरीचे चित्रीकरण प्रांतांना केले सादर

म्हसवड– माण नदीच्या पात्रात वाळू माफियांनी हैदोस घातला असून शासकिय अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या वाळू चोरी सूरू असल्याचा आरोप नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी केला आहे. याबाबतचे चित्रीकरण त्यांनी करून वाळू उपसा बंद असल्याचा दावाच खोटा ठरवला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

-Ads-

विरकर यांनी दिलेली माहिती अशी, बेसुमार वाळु उपशामुळे माणगंगेचे चित्रच पालटले आहे. नदीपात्रात मोठमोठे खड्डे झाले आहेत. परंतु, वाळु उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने नेमलेल्या भरारी पथकातील सदस्य, अधिकारी, तलाठ्यांचे व वाळुचोरांचे लागेबांधे असल्याने बेसुमार वाळु उपसा सुरु आहे.

प्रशासनातील काही शुक्राचार्यांच्या नातेवाईकांची वाहनेही या वाळू सम्राटांच्या वाहनांच्या ताफ्यात आहेत. याबाबत तहसिलदारांना कळवले असता वाळू उपसा बंद असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नगराध्यक्ष विरकर यांनी माणगंगा नदीपात्रात दिवसा-ढवळ्या सुरू असलेल्या वाळू उपशाचे चित्रीकरण करून याची माहिती प्रांताधिकारी यांना दिली आहे.

वाळू माफियांबरोबरच प्रशासनातील शुक्राचार्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने पाऊले न उचलल्यास ते सर्व चित्रीकरण जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांकडे देणार असल्याचे विरकर यांनी स्पष्ट केले.

हप्ते वसुलीसाठी माळशिरस तालुक्‍यातील वाळू सम्राट

माण नदीपात्रातून वाळु उपसा करणाऱ्या सर्व वाळु चोरांकडुन नियमीतपणे हप्ते वसूली करण्याचे काम शेजारील माळशिरस तालुक्‍यातील वाळु माफियाकडे देण्यात आले आहे. तो सांगेल त्याच्यावरच वाळु चोरीची कारवाई होत असल्याचा दावा नगराध्यक्ष तुषार विरकर यांनी केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)