अधिकाऱ्यांकडून “पाणी कोंडी’

– महासभेत आरोप : भाजप नगरसेवकाची नाराजी

पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात “पाणी अडवा अन्‌ नगरसेवकांची जिरवा’ हे धोरण महापालिका प्रशासन राबवत आहे. पाण्याची बोंब असताना सहा महिन्यांपूर्वी मंजूर झालेल्या पाणी धोरणाची अंमलबजावणी न केल्यावरून गुरूवारी (दि. 6) महापालिका सर्वसाधारण सभेत चर्चा झाली.

शहरातील नागरिकांनी अनधिकृतपणे घेतलेले नळजोड थांबविण्यासाठी, तसेच महापालिकेच्या उत्पन्नाचा टक्‍का वाढविण्यासाठी महापालिकेने पाणीपट्टी दरवाढीबरोबर अनधिकृत नळजोडाबाबत धोरण तयार केले. मात्र, धोरणावर शिक्कामोर्तब होऊन सहा महिने उलटले, तरी ते महापालिका प्रशासनाने बासनात गुंडाळून ठेवले आहे. त्याबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी सभेत अनधिकृत टपऱ्या व अतिक्रमणांवरून चर्चा करताना अनधिकृत नळजोड व शहरातील पाणी पुरवठ्याचा विषय मांडला.

तुषार कामठे म्हणाले की, सध्या शहरात पाणी पुरवठा विस्कळीत असून नाकरिकांना त्रास होत आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी पाणी अडवा आणि पाणी जिरवा हे धोरण राबविले जात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाणीपट्टी दरवाढ आणि अनधिकृत नळजोड कायम करण्याच्या धोरणाला 28 फेब्रुवारी 2018 रोजीच्या सभेत मंजुरी दिली. त्याची अंमलबजावणी पाणी पुरवठा विभाग व अधिकाऱ्यांनी सहा महिने उलटले, तरी केलेली नाही. प्रभागात कामे करताना नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसून परस्पर काहीही केले जाते, असेही कामठे म्हणाले.

अष्टीकरांचे पदभार काढून घ्या
महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे अनेक विभागांचा कारभार आहे. त्यांचे लक्ष नाही. एका अधिकाऱ्याला एक आणि दुसऱ्याकडे अनेक विभाग का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांच्याकडील पदभार काढून घेण्याची मागणी सभेत नगरसेवकांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)