अधिकारी झोपेत सह्या करतात का?

जिल्हा परिषद सदस्यांचा संतप्त सवाल : शाळांना दिलेली खेळणी, आहाराचा दर्जा निकृष्ट

पुणे – महिला व बालकल्याण विभागाकडून खरेदी केलेली खेळणी निकृष्ट दर्जाची आहेत. पोषण आहार वेळेत मिळत नाही तर, शिक्षण विभागाकडून शाळांना दिलेले लेझीम विद्यार्थ्यांना शाररिक इजा पोहचवणारे आहे. धक्कादायक बाब म्हणजे या वस्तू खरेदीसाठी संबधित विभागाकडून काढण्यात येणाऱ्या निविदांमध्ये कोणत्याच वस्तूंचे “स्पेसिफिकेशन’ नसते. हे अधिकारी काय झोपेत सह्या करतात का, असा संतप्त सवाल सदस्यांनी उपस्थित केला. तसेच निम्म्याहून अधिक निविदा हे क्‍लार्क फायनल करतात. त्यामुळे जिल्हा परिषद ही “अधिकारी नाही तर, क्‍लार्क’ चालवतात, असा गौप्यस्फोट भाजपचे गटनेते शरद बुट्टेपाटील यांनी सभागृहात केला.

जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभेची सुरूवातच महिला व बालकल्याण विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या खेळण्यांपासून झाली. संबधिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी निकृष्ट दर्जाची खेळणी विकत घेतल्याचा आरोप सदस्यांनी करत, सर्व खेळण्यांसह शिक्षण विभागाकडून खरेदी केलेले लेझीम, टेनीस बॉल, समाज कल्याण विभागाचे तुणतुणे हे सर्व साहित्य सदस्यांनी सभागृहात आणून अधिकाऱ्यांची “पोलखोल’ केली.

याबाबत अधिक बोलताना शरद बुट्टेपाटील म्हणाले की, शिक्षण विभागाकडून विविध वस्तू खरेदीसाठी काढण्यात आलेल्या निविदांमध्ये कोणतेही स्पेसिफिकेशन नाही. परस्पर सदस्यांना अंधारात ठेवून साहित्यांची खरेदी होते आणि संबधित ठेकेदाराला पैसेही दिले जातात. मात्र, ज्या वस्तूंचा पुरवठा झाला, त्याचा दर्जा हे अधिकारी पाहत नसून, सदस्यांना नेहमी अंधारात ठेवून कामे करतात. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, सदस्य दत्तात्रय दरेकर, विरधवल जगदाळे यांसह अन्य सदस्यांनी सभागृहात लेझीम आणि अंगणवाड्यातील खेळणी खरेदीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दरम्यान, समाजकल्याण विभागाकडून देण्यात आलेले तुणतुणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे दरेकर यांनी सभागृह “तुणतुणे वाजवून’ निषेध केला. लेझीम खरेदीमध्ये संबधीत ठेकेदाराला दिलेले 50 लाख त्वरीत परत घेण्यात यावे आणि यापुढे जोपर्यंत वस्तूची शहानिशा होत नाही, तोपर्यंत ठेकेदारांना निधी देऊ नये, अशी मागणी सदस्यांनी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली. त्यावेळी याप्रकरणाची चौकशी करून संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करा आणि ठेकेदारांकडून पैसे परत घेण्यात यावे, अशा सूचना अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या.

शिक्षण विभागाकडून खरेदी करण्यात आलेल्या लेझीमध्ये काही थोड्या प्रमाणातच लेझीम खराब असून, संबधित ठेकेदाराला त्याबाबत कल्पना दिली आहे. त्यानुसार खराब लेझीम बदलून देण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुरक्षित असलेले लेझीमच त्यांना देण्यात येतील.
– विवेक वळसे-पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद


निविदांमध्ये स्पेसिफिकेशन असणे महत्त्वाचे आहे. यापुढे त्याची खबरदारी घेण्यात येईल. त्यासाठी जीओ टॅगिंगही अनिवार्य केले आहे. तसेच ज्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्याचा दर्जा पाहणे आणि झालेल्या पुरवठ्यात त्याच वस्तू आहेत की नाही शहानिशा झाल्याशिवाय कोणतेही बील ठेकेदाराल देण्यात येणार नाही. दरम्यान, अंगणवाड्यातील निकृष्ट साहित्य खरेदीबाबत चौकशी करणे सुरू असून एका महिन्यात चौकशी पूर्ण करून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
– सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)