अधिकारी आले अन्‌ कारवाई न करताच गेले!

गोपाळपूर – नेवासे-गेवराई रस्त्यावरील गेवराई गावापासून दोनशे मीटर अंतरावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत असलेल्या लिंबाच्या झाडांची बेसुमार तोडणी करण्यात आली. ग्रामपंचायतीनेच वृक्ष तोडण्याची सुपारी दिल्याने गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाला कळवले. अधिकारी आले; मात्र कोणतीही कारवाई न करता निघून गेल्याने परिसरात आर्थिक तडजोडीची दिवसभर चर्चा रंगली होती.
दिवसेंदिवस बेसुमार वृक्ष तोडणीमुळे झाडांची संख्या कमी कमी होत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. शासन ग्रामपंचातींना झाडे लावण्यासाठी लाखो रुपये देत आहे; परंतु गेवराई ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी गावात वृक्षतोडीचा ठराव केला. गावातील मोठमोठी पाच-सहा झाडे तोडण्याचे ठरवले. त्यासाठी ना वन विभागाची परवानगी घेतली ना बांधकाम विभागाची. ग्रामस्थांना ही विश्वासात घेतले नाही. वृक्षतोड होत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याबाबतची माहिती दिली. नागरिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाचे अधिकारी आले. वृक्षतोडीची पाहणी केली. एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते. दुसरीकडे गेवराईतील अधिकारी, पदाधिकारी बेसुमार वृक्षतोड करण्यास परवानगी देतात. तसा ठराव ग्रामसभेत न करता मासिक सभेत करतात. जी झाडे बांधकाम विभागाच्या हद्दीत असून, त्यांची परवानगी घेतली नाही. ज्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर वृक्षरक्षणाची जबाबदारी आहे, ते ही वृक्षतोड करणाऱ्यांना पाठिशी घालतात. कारवाई न करताच परत जातात. त्यामुुळे संबंधित विभागाबद्दल नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
गावात चालू वर्षी नवीन वृक्ष लागवड न करता आहे, तीच झाडे तोडण्याचे सत्र आरंभल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वनविभागाशी संपर्क साधला असता, एका अधिकाऱ्याने वृक्षतोड बंद केल्याचे सांगितले. सरपंच व पदाधिकाऱ्यांना वृक्षतोडीची नगरहून परवानगी आणण्यास सांगितले. ज्यांची झाडे जगविण्याची जबाबदारी, त्यांनीच वृक्षतोडीची परवानगी आणायला सांगावे, याबद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. वृक्षतोडीबद्दल काय कारवाई केली, याबाबत उत्तर देणे त्यांनी टाळले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)